परमात्मा आनंदमय आहे. जीव त्याचाच अंश असल्याने आनंदमयच आहे, पण ‘मी’पणामुळे तो आनंदापासून, आपल्या मूळ स्वरूपापासून दुरावला आहे, असं संत सांगतात. माणसाला मात्र ते या घडीला पटत नाही. जीवनात आपण एवढं दु:खं भोगत असताना, अनंत गोष्टी मनाविरुद्ध घडत असताना, संघर्षांत भरडलो जात असताना आपण त्या सर्वशक्तिमान परमानंदमय परमात्म्याचा अंश आहोत, आपणही सच्चिदानंदस्वरूप आहोत, हे त्याला खरं वाटत नाही, मग स्वीकारण्याची गोष्ट दूरच! विवेकाच्या सततच्या आधारानं जीवन घडवत राहून आपल्या मूळ शुद्ध स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला आपल्या आवाक्यातला वाटत नाहीच आणि गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे ते सारं काल्पनिकही वाटतं. म्हणून मग समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १४६व्या श्लोकात आताचं जे जगणं आहे, त्या जगण्याचा परीघ असलेलं जे जग आहे त्याकडे लक्ष द्यायला सांगतात. आपणही रोज जग पाहातो, अनुभवतो आणि त्या जगात वावरतो. पण तरीही त्या जगाचं खरं स्वरूप आपण जाणत नाही. अशाश्वतता हाच या जगाचा शाश्वत गुण आहे, हे रोज अनुभवूनही आपण याच जगातल्या अशाश्वत आधारांवर शाश्वत सुख मिळवण्यासाठी धडपडत राहतो. म्हणून समर्थ सांगतात, हे मना, ज्या ज्या गोष्टींवर तू विसंबून आहेस त्या त्या गोष्टी काळाच्याच आधीन आहेत. त्या गोष्टींवर विसंबणारा तूदेखील काळाच्याच आधीन आहेस.. आणि जे जे या जगात आकाराला आलं आहे ते ते नष्ट झालेलं आहे (अकस्मात आकारलें काळ मोडी). आज जे दिसत आहे ते सर्व पुढे जाणार आहे, ओसरणार आहे, यातलं काहीही राहणार नाही. (अकस्मात आकारलें काळ मोडी). मग याच अशाश्वत जगात शाश्वत काय आहे ते शोधण्याचा ध्यास घे. या संकुचित जगात व्यापक काय आहे, अनंत काय आहे, त्याचा शोध घे. (मना संत आनंत शोधूनि पाहें). ते कसं आणि किती शाश्वत आहे, हे सांगताना समर्थ पुढील श्लोकात काय सांगतात ते आता पाहू. हा श्लोक असा आहे:
फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचलें मीपणें तें कळेना।
तया येकरूपासि दुजें न साहे।
मना संत आनंत शोधूनि पाहे ।। १४७।।
प्रचलित अर्थ : तो देव फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. सर्वत्र तो कोंदाटला असून मीपणा आहे तोवर मात्र तो कळत नाही. तो एकरूप असल्यामुळे एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्याला दुजे खपत नाही. असा तो अनंत संत म्हणजेच शाश्वत परब्रह्म हे मना तू शोधून पाहा.
आता मननानार्थाकडे वळू. आता प्रचलित अर्थात हे सर्व वर्णन देवाचं म्हणून सांगितलेलं आहे. हा देव म्हणजे नेमका कोण, हे पुढे कळेलच, पण इथे श्लोकात ‘सदा संचला मीपणे तो कळेना,’ असं म्हटलेलं नाही, तर, सदा संचलें मीपणें तें कळेना, असं म्हटलं आहे. याचाच अर्थ हे एका तत्त्वाचं वर्णन आहे. इथं तो देव नव्हे, तर ते तत्त्व सूचित केलेलं आहे. हे तत्त्व कसं आहे? तर ते फुटत नाही, तुटत नाही, मूळ स्थानापासून कधीच चळत नाही की ढळत नाही. याचाच अर्थ ते पूर्ण एकसंध आहे. पक्कं आहे. मूळ स्थानाशीच सदैव स्थित आहे, तिथपासून ते कधीच ढळत नाही. हे तत्त्व ‘सदा संचले’लं आहे. म्हणजे सदासर्वदा सर्वत्र व्याप्त आहे. पण मीपणामुळे ते समजू शकत नाही. कळू शकत नाही. कारण सदैव मूळ परमात्म्याशी एकरूप असं जे हे तत्त्व आहे त्याला कोणत्याही प्रकारचा दुजेपणा सहन होत नाही. एखाद्या विचाराला जेव्हा आत्मसात करायचं असतं तेव्हा त्या विचाराशी आपण जेवढं समरस, एकरूप होऊ शकतो तेवढं त्याचं आकलन होऊ शकतं. हे समरस होणं म्हणजे?