मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असून रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलं असल्याने मस्जिद रोड ते भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. यामधील २०० प्रवाशांची सुटका करण्यात आली असून मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे.

सीएसटी येथून कर्जतला निघालेल्या पहिल्या ट्रेनमधून २०० जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अद्यापही १०० ते १२० प्रवासी आतमध्ये अडकलेले असण्याची शक्यता आहे. दुसरी लोक कर्जतहून सीएसटीला चालली होती.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून सीएसएमटी-ठाणे तसंच सीएसएमटी-वाशी ट्रेन सेवा बंद करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत आणि वाशी ते पनवेल दरम्यान शटल सेवा सुरु आहे. सीएसएमटीवरुन निघालेल्या ट्रेनचे तीन डबे स्टेशनला लागले आहेत. नऊ डबे मागे राहिले आहेत. त्यामधील २०० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. अजून किती प्रवासी ट्रेनमध्ये आहेत याची माहिती घेत आहोत. घाबरण्याची काही गरज नाही. ट्रॅकवरुन पाणी पूर्ण जात नाही तोपर्यंत ट्रेन सुरु केली जाणार नाही”.