News Flash

सैनिकांच्या अपमानाचा भाजपला विसर कसा?

परिचारक निलंबनप्रकरणी भाजपेतर पक्ष एकत्र

परिचारक निलंबनप्रकरणी भाजपेतर पक्ष एकत्र

सीमेवर रोजच सैनिकांचे रक्त सांडत असताना सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणारे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा ठराव गोंधळात मंजूर केला जातोच कसा, असा सवाल करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस भाजपविरोधात एकवटले आहेत. सोमवारी परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याचा ठराव शिवसेनेकडून आणण्यात येणार असून आता सैनिकांच्या बाजूने कोण आहेत ते स्पष्ट होईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

पंढरपूर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी अपमानास्पद उद्गार काढल्यानंतर विधिमंडळात तीन दिवस त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर ९ मार्च २०१७ रोजी परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले व उच्चाधिकार समिती नेमून याप्रकरणी परिचारकांचे म्हणणे ऐकण्यात आले. या अहवालात परिचारकांनी याप्रकरणी माफी मागितली, अनवधानाने विधान केले, सैनिकांबाबत क्षमायाचना केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आतापर्यंत दिलेली शिक्षा पुरेशी असल्याचे मत व्यक्त करत निलंबन मागे घेण्याची शिफारस समितीने अहवालात केली. मात्र निलंबनाच्यावेळी तीन तास चर्चा झाली होती आणि भीमा-कोरेगाव प्रकरणावरून सभागृहात गदारोळ असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडलाच कसा असा सवाल शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. आता या ठरावावर पुन्हा चर्चा होईल तेव्हा सैनिकांच्या बाजूने कोण त्याचा खरा चेहरा उघड होईल, असेही त्यांनी सांगितले. पाटील यांनी ज्या पद्धतीने गोंधळात ठराव मांडला ते चुकीचे असून आमचा या ठरावाला विरोध आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

चांगल्याकार्यकर्त्यांसाठी गोंधळात ठराव

महामंडळांवरील नियुक्तीसाठी भाजपमध्ये भिंग घेऊन चांगले कार्यकर्ते शोधावे लागतील, असे विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना परिचारकांमध्ये ‘चांगला कार्यकर्ता’ दिसला म्हणून त्यांनी गोंधळात ठराव मांडला का, असा सवाल शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी केला. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या छिंदमनेही माफी मागितली आहे. त्यालाही भाजप माफ करणार का, असाही मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना माफ करणार नाही, असे प्रभू यांनी सांगितले. याप्रकरणी भाजपचे संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच लघुसंदेश पाठवला परंतु संपर्क होऊ शकला नाही.

प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी जे घाणेरडे वक्तव्य केले त्याला माफी नाही. परिचारक निलंबितच राहिले पाहिजेत. त्यासाठी सर्वानी एकत्र राहायला हवे.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 3:55 am

Web Title: bjp mla insult of soldiers prashant paricharak shiv sena
Next Stories
1 राज्यपालांच्या आदेशानंतरही दोषींचा शोध लागेना!
2 आंजर्ले किनारपट्टीवर कासवांची सर्वाधिक घरटी
3 डॉक्टरांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालये ओस?
Just Now!
X