मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासाचा कैवार घेतलेल्या दोन राजकीय चित्रपट सेनांमध्ये सध्या एक वेगळीच चढाओढ सुरू आहे. मनोरंजनसृष्टीतील मोठमोठय़ा कलाकारांनी आपल्या कळपात यावे, यासाठी या दोन्ही चित्रपट सेनांमध्ये स्पर्धा चालू आहे. शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर या कलावंताची नेमणूक करत सेनेने आघाडी घेतली असताना बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही दहा कलाकारांना आपले मानद सदस्यत्व देत आपले पारडे जड असल्याचे दाखवून दिले.
भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदावरून अभिजित पानसे यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्या ठिकाणी आदेश बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ‘समन्वय व आक्रमकतेचा मिलाफ’ हे धोरण समोर ठेवून बांदेकर यांनी तातडीने गिरीश ओक विरुद्ध रामगोपाल वर्मा या प्रकरणाची तड लावत ओक यांना ‘आपलेसे’ केले. तर बुधवारी पुरुषोत्तम बेर्डे, सुहास जोशी, रिमा लागू, श्रीरंग गोडबोले, मकरंद देशपांडे, आसावरी जोशी, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, राहुल रानडे आणि संग्राम साळवी या कलाकारांनी ‘मनचिसे’प्रवेश केला.‘मनचिसे’चे अध्यक्ष अमेय खोपकर यांना ‘चढाओढी’बाबत विचारले असता, आपल्याला कोणाशीही स्पर्धा करायची नाही, असे उत्तर त्यांनी दिले.