‘माझे कुटुंब..’ सर्वेक्षण सोपे, माहिती भरणे अवघड!

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत माहिती भरण्यासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या अ‍ॅपमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे येत असलेल्या अडचणींमुळे आरोग्य कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा धोशा आणि दुसरीकडे अ‍ॅपमधील   त्रुटी यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी हे अ‍ॅप डोकेदुखी बनले आहे.

जनतेच्या सहभागातून करोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम मुख्यमंत्र्यांनी सुरू केली असून या अंतर्गत १५ सप्टेंबरपासून राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे. आरोग्य पथकांच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेट देऊन संशयित करोना रुग्णांची तपासणी, उपचार, अतिजोखमीच्या व्यक्तींचे निदान आणि आरोग्य साक्षरतेचे प्रयत्न केले जात आहेत.  ही सर्व माहिती भरण्यासाठी आरोग्य विभागाने अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. परंतु त्यातील त्रुटींमुळे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यापेक्षा माहिती भरणे अधिक कटकटीचे बनले आहे.

माहिती ऑफलाईन भरून नेटवर्कमध्ये आल्यानंतर सर्व माहिती पाठविण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये दिली आहे. परंतु ऑफलाईन जमा केलेली माहिती पाठविण्यात अनेक अडचणी येत असल्याने अनेकदा ही माहिती नष्ट होते. त्यामुळे केलेली मेहनत वाया जाते. कुटुंबानुसार माहिती भरायला लागते. संपूर्ण कुटुंबाची माहिती भरल्यानंतर माहिती जतन होते, कधीकधी होत नाही. मग पुन्हा सर्व माहिती भरावी लागते. आमच्या विभागात पावणे दोन लाख घरे असून चाळीस हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. परंतु सॉफ्टवेअरमध्ये यातील दहा हजार घरांची माहिती भरून झालेली आहे. आरोग्य कर्मचारी यामुळे वैतागले असल्याचे मुंबई पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘दुर्गम भाग असून नेटवर्क अनेकदा उपलब्ध नसते. त्यामुळे माहिती अपलोड होण्यास खूप वेळ लागतो. एका कुटुंबाची माहिती लिहिताना पाच ते सहा सदस्यांची माहिती भरल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड येतात. त्यामुळे सहापेक्षा अधिक कुटुंबात सदस्य असतील तर सलग माहिती भरता येत नाही. सॉफ्टेवअरचा आता १५ दिवस आम्ही वापर करत आहोत. ठाणे जिल्हास्तरावर आम्ही अनेकदा संबंधित कंपनीपर्यत त्रुटींबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप यांचे निवारण झालेली नाही,’ अशी माहिती भिवंडी पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.

अ‍ॅपमधल्या या त्रुटींमुळे वह्यंमध्ये याच्या नोंदी करून मग नंतर अ‍ॅपमध्ये भरण्याचे काम सुरू केले आहे. तेव्हा दोन वेळा मेहनत करण्यापेक्षा आरोग्य विभागाने लेखी माहिती घेऊन अ‍ॅपमध्ये भरण्याचे काम दुसऱ्या कोणाला तरी दिले तरी सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण होईल, असे मत सातारा येथील आशा सेविकेने व्यक्त केले.

‘शंभर रुपये मोबदला तुटपुंजा’

करोनापासून संरक्षण करण्यास साधने तर नाहीच, परंतु नोंद करण्यासाठी वह्यदेखील आरोग्य विभागाने दिलेल्या नाहीत. दिवसभर ५० घरांचे सर्वेक्षण केल्यावर १०० रुपये मोबदला अगदीच तुटपुंजा आहे. त्यात समाजाकडून होणारी हेटाळणी आणि घरातल्यांचा दबाव अशी दोन्हीकडून कुचंबणा होत असल्याची तक्रार पुणे येथील आशा सेविकेने केली.

आरोग्य अभियान संचालकांचा दावा

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत विचारले असता,  राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले की, २५ सप्टेंबरपर्यत मुदत असलेल्या या मोहिमेत राज्यातील १२ कोटी घरांचे लक्ष्य आहे. आतापर्यत पावणे तीन कोटी घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अ‍ॅपबाबत सुरुवातील तक्रारी होत्या. परंतु संबंधित कंपनीशी चर्चा करून त्या सोडविल्या आहेत. सीएसआरमार्फत कंपनीने  हे अ‍ॅप मोफत दिले असून कंपनीने योग्यरितीने त्याची रचना केलेली आहे.  सात हजार आरोग्य कर्मचारी एकाच वेळेस माहिती भरत असल्याने थोडय़ाफार अडचणी येत आहेत. लेखी नोंद करून नंतर ऑनलाईन भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.