|| रसिका मुळ्ये

तज्ज्ञांचे स्पष्टीकरण 

भूकंपाच्या सततच्या धक्कय़ांनी हादरलेल्या पालघर परिसरात मोठय़ा भूकंपाची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. हादरलेल्या पालघरमध्ये भूकंपाच्या धक्कय़ांपेक्षाही चर्चा, तर्कवितर्क, अफवा यांची तीव्रता अधिक आहे. मोठा भूकंप होण्याच्या चर्चामुळे लोकांमध्ये भीती पसरत आहे. मात्र मोठय़ा भूकंपाची चर्चा शास्त्रीय पातळीवर निराधार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

भूकंपतज्ज्ञ अरुण बापट म्हणाले, ‘‘हे भूकंपाचे धक्के कमी क्षमतेचे आहेत. यापूर्वी १९७५ मध्ये बलसाडमध्ये असेच धक्के बसले होते. आठ-नऊ  महिन्यांनंतर ते थांबले. पालघर परिसरात १९८६-८७ मध्ये असेच प्रकार घडले होते. महाराष्ट्रात कोयना आणि नंतर किल्लारीत मोठा भूकंप झाला. त्यांची तीव्रता ६ ते ६.५ रिश्टर स्केलपर्यंत होती. मोठे भूकंप होतात तेव्हा कंपनांची लांबी अधिक असते. तेवढी लांबी पालघर येथे नाही. त्यामुळे मोठा भूकंप होण्याची शक्यता वाटत नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.’’ भूकंपतज्ज्ञ व्ही. के. गेहलोत म्हणाले, ‘‘आम्ही या भागातील भूकंपमापन यंत्रे वाढवली आहेत. यापूर्वी जव्हार, सौराष्ट्र भागांत १९९४, २०१२, २०१८ मध्ये अशा प्रकारची नोंद झाली आहे. मोठय़ा भूकंपाची शक्यता वाटत नाही. मात्र इतक्यात ठोस निष्कर्ष काढणे अयोग्य आहे.’’