एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघवींना नुकतीच बढती देण्यात आली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याचा राग एका सहका-याच्या मनात होता. त्यानेच संघवी यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती आहे.

एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या ३७व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बुधवारपासून बेपत्ता असलेल्या संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे. कल्याणमधील हाजी मलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे.

बुधवारी सायंकाळपासून मुंबईतील कमला मिल परिसरातून गायब झालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (३८) यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हत्याप्रकरणी सरफराज शेख या आरोपीला कोपरखैरणे येथील बोनकोडे भागातून अटक केली होती, त्याच्याकडून हत्येची कबुली देण्यात आल्याची माहिती आहे. संघवी यांचा मृतदेह हाजीमलंग रस्त्यावर टाकून दिल्याची माहिती सरफराज याने दिल्याने मुंबई पोलिसांनी हाजिमलंग परिसरामध्ये मृतदेहाची शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी या अन्य तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

एचडीएफसीमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या संघवी यांचे लोअर परेल येथील कमला मिल येथे ऑफीस आहे. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातून बाहेर पडले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. तपासात संघवी यांची चारचाकी गाडी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग आणि चाकू सापडला. या कारमध्ये पोलिसांना एका चाकूसह मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळून आल्याने मुंबई पोलिसांसह नवी मुंबई पोलिसांनी देखील संघवी यांची कार कोपरखैरणे भागात आणणाऱ्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. अखेर कोपरखैरणेतील बोनकोडे भागात रहाणाऱ्या सरफराज शेख याने संघवी यांची कार तिथे आणल्याचे सीसीटीव्ही व मोबाइल संभाषणाच्या तांत्रिक तपासाद्वारे आढळून आले. तसेच या कारची चावी सरफराजच्या घरी आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेतल्यानंतर त्याने संघवी यांच्या हत्येची कबुली दिली.