गेल्या आठवडय़ाभरात सरासरीच्या एक ते दोन टक्के पाऊस

मुंबई : कोकण किनारपट्टी आणि पुणे, सातारा हे जिल्हे वगळता राज्यात इतरत्र पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खाली गेले आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाला पावसाच्या ओढीचा सर्वाधिक फटका बसला. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडवला असतानाच आणि पूर्व किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्राने पश्चिम बंगालमध्येही  पूरस्थिती असताना महाराष्ट्र मात्र पावसासाठी आसुसलेला आहे.  पुढील आठवडाभरही राज्यात पावसाची शक्यता नाही.

यावर्षी राज्यासह मध्य भारतात सरासरीएवढा पाऊस होईल असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने जूनमध्ये जाहीर केला होता. जूनअखेर मराठवाडय़ातील बुलढाणा आणि जालना तसेच विदर्भातील गोंदिया वगळता इतरत्र पावसाने सरासरी गाठली होती. त्यातच जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात मराठवाडा वगळता राज्याच्या सर्व भागात पावसाने धुमाकूळ घातला. आठवडाभराहून अधिक काळ संततधार धरलेल्या पावसामुळे १८ जुलैपर्यंत बहुतांश जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा दीडशे ते दोनशे टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. नंदुरबार, बुलढाणा, जालना, औरंगाबाद येथे पावसाने जास्त मुक्काम केला नव्हता. मात्र त्यानंतर तीन आठवडय़ांहून अधिक काळ पावसाने राज्यात प्रवास केलेला नाही.

गेले दोन आठवडे राज्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झालेला नाही. हवामानशास्त्र विभागाकडून बुधवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ८ ऑगस्टपर्यंतच्या सात दिवसात किनारपट्टी भागात सरासरीच्या अवघा ४० ते ५० टक्के पाऊस झाला असून उर्वरित राज्यात तर दयनीय स्थिती आहे. मुंबईतही केवळ २० ते २७ टक्के पाऊस झाला. याचाच परिणाम अडीच महिन्यांच्या पावसाच्या सरासरीवरही झाला असून १ जून ते ८ ऑगस्टपर्यंत पावसाचे एकूण प्रमाण पाहता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता कुठेही पावसाने सरासरीपेक्षा जास्त कामगिरी केलेली नाही.