राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी आरोप असलेले महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषेदत बोलताना भूमिका मांडली. “संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे व तो स्वीकारलेला आहे. तसेच, या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशीचे  व तपासाचे आदेश दिले आहेत” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं  आहे.

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा

“सरकार चालवतांना आमची जबाबदारी असते न्यायाने वागणे, पण मागील काही महिन्यात एकूण  गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे. तपास हा झालाच पाहिजे. पण हा तपास नि:पक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कुणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कुणी दोषी असेल. तर तो कोणी कितीही मोठा असला, तर त्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. अशी या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. आज संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, केवळ राजीनामा घेणं. हातात काही पुरावे असोत नसो गुन्हा दाखल करून मोकळं होणं म्हणजे कुणाला न्याय देणं असं होत नाही.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, “तपास यंत्रणेवर व तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता कामा नये, पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे. त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, असाही तपास असता कामा नये, असंही दडपण असता कामा नये. हे मुद्दाम सांगतो आहे कारण मागील वर्षभरापासून, अशा काही घटना अशा काही गोष्टी घडत आहेत, की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही,  हा नि:पक्षपातीपणाने सुरू आहे.” असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

“जे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवलं, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे”

“ज्या क्षणी ही घटना आम्हाला कळाली त्याच क्षणी आम्ही या घटनेची नि:पक्षपातीपणाने चौकशी व तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यातून जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कुणालाही पाठिशी घालणार नाही. जो कुणी त्यात आरोपी असेल, त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून, तपासाची दिशा भरकटून टाकायची. हा जो काही प्रकार आणि प्रघात घातला जातो आहे, हा फार गंभीर आहे. अगोदर चौकशी नीट होऊ द्या. तपास नीट होऊ द्या. ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावर तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळात देखील हीच तपासयंत्रणा होती.” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.