28 October 2020

News Flash

पुस्तकांची निवड पारदर्शीच!

प्रकाशक म्हणतात,‘आम्ही समाधानी’

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एकभाषिक योजनेप्रकरणी शासनाचा दावा; प्रकाशक म्हणतात,‘आम्ही समाधानी’

एकभाषिक पुस्तक योजनेतील नव्याने केलेली पुस्तकनिवड ही पारदर्शीच असल्याचा दावा शासनाने केला आहे. नरेंद्र मोदींच्या पुस्तकांची संख्या वाढली असली तरी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील आणि नद्या, प्राणी, पर्यावरण अशा विविध विषयांवरील पुस्तकांची निवड करण्यात आली असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

एकभाषिक पुस्तक योजनेत घोटाळा झाल्याचे जाहीर करून शिक्षण विभागाकडून पुस्तकनिवडीची प्रक्रिया नव्याने राबवण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असल्याचे समोर आले. याप्रकरणी पुस्तकांची निवड पारदर्शी पद्धतीनेच झाली असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. ‘प्रकाशनांनी पुस्तकनिवडीबाबत आक्षेप घेतल्यामुळे शासनपत्रानुसार तांत्रिकदृष्टय़ा पात्र ठरलेल्या निविदाधारकांच्या सर्व पुस्तकांचे आशयात्मक फेरमूल्यांकन करण्यासाठी नव्याने समिती गठित करण्यात आली. सर्व पुस्तकांचे आशयात्मक फेरमूल्यांकन करून यादी शासनास सादर करण्यात आली. मूल्यांकन समितीद्वारे करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनातून प्राप्त गुणांकनाच्या आधारे निवड करण्यात आली. भारतीय विचार साधना व इतर अन्य प्रकाशनांची मिळून छत्रपती राजे शिवाजी यांची ३,३५,९०७ पुस्तके तसेच डॉ. अब्दुल कलाम यांची २,५०,००० ची पुस्तके व त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या जीवनावरील सुमारे २ लाख पुस्तके निवडण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील गड, किल्ले, नद्या व अन्य माहिती देणारी हजारो पुस्तकेही समाविष्ट करण्यात आलेली आहेत. गुजराती माध्यमातील ‘चाचा चौधरी और नरेंद्र मोदी’ या शीर्षकाची गुजराती माध्यमाची फक्त ३३ पुस्तके समाविष्ट केली आहेत व इंग्रजी माध्यमाची ७१४८ पुस्तके तज्ज्ञ समितीने सुचवल्यानुसार घेण्यात आली आहेत. पुस्तक निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाल्याविषयी विविध प्रकाशक संघटनांनी समाधानही व्यक्त केलेले आहे,’ असे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकाशक काय म्हणतात?

प्रकाशकांनीही ‘आमच्या पुस्तकांची निवड झाली, आम्ही या निवड प्रक्रियेवर समाधानी आहोत,’ अशी भूमिका घेतली आहे. ‘पूर्वीच्या यादीत राज्यातील ८० प्रकाशकांपैकी सुमारे ३० प्रकाशकांकडून एका रुपयाचीही खरेदी करण्यात आली नव्हती. त्याविरुद्ध प्रकाशकांनी आक्षेप घेतला आणि पूर्वीच्या याद्या रद्द करून नव्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. योजनेमध्ये भाग घेतलेल्या जवळजवळ सर्व प्रकाशकांची पुस्तके स्वीकारली गेली. त्यामुळे सर्व मराठी प्रकाशकांचे समाधान झाले आहे. त्यामुळे ही योजना कोणत्याही वादात नाही. निवडलेल्या पुस्तकांमध्ये पौराणिक व ऐतिहासिक विषय अधिक असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे,. पण हे विषय शालेय क्रमिक पुस्तकांतून वर्षांनुवर्षे शिकवले जातात. त्यामुळे अवांतर वाचनात त्याचे वावडे असण्याचे कारण नाही. प्रकाशकांनी या योजनेमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे प्रकाशकांचे आर्थिक नुकसान होऊ नये असे प्रकाशक संघास वाटते,’ अशा आशयाचे पत्रक अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने काढले आहे.

याद्यांमधून काय दिसते?

  • महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके – साधारण ७६ हजार ७१३
  • सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुस्तके – साधारण सहा हजार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके – साधारण ८० हजार
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके – तीन लाख ३५ हजार ९०७ (भारतीय विचार साधना) आणि इतर प्रकाशनांची साधारण पाच हजार
  • महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके- साधारण साडेचार हजार
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील पुस्तके – साधारण साडेतीन हजार
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तके – ७२ हजार ९३३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तके

  • चाचा चौधरी आणि मोदी – (गुजराती) ३३ प्रती, (इंग्रजी) सात हजार १४८ प्रती, (मराठी) ७२ हजार ९३३ प्रती (प्रकाशन दिल्ली येथील)
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी (हिंदी) ४२४ प्रती (प्रकाशन दिल्ली येथील)
  • नरेंद्र मोदी (मराठी) ६९ हजार ४१६ प्रती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:32 am

Web Title: single language book scheme in school
Next Stories
1 खाऊखुशाल : पॉपकॉर्नचे ५० फ्लेव्हर्स
2 विनयभंगाच्या गुन्ह्यात महेश मूर्ती यांची चौकशी
3 पोलिसांच्या ‘बुलेटप्रुफ जॅकेट’च्या दर्जाबद्दल संभ्रम कायमच!
Just Now!
X