मुंबई विद्यापीठाच्या महत्त्वाच्या समित्यांमधून वगळण्याची तयारी सुरू
गेली काही वर्षे आपल्या महाविद्यालयात ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’च्या (एआयसीटीई) नियम व निकषांनुसार कोणत्याही त्रुटी नसल्याचे खोटे लिहून देणारे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य उघडे पडले असून मुंबई विद्यापीठाने याची गंभीर दखल घेत या साऱ्याची छाननी करून विद्यापीठाच्या ‘स्थानीय चौकशी समिती’मधून (एलआयसी) बेदखल करण्याची तसेच विद्यापीठाच्या अन्य समित्यांमधून वगळण्याची तयारी सुरू झाली आहे.
राज्यातील सुमारे १६८ अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य गेली पाच वर्षे ‘एआयसीटीई’ला महाविद्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा असल्याचे प्रतिज्ञापत्रावर खोटे लिहून देत होते. एआयसीटीई, तसेच त्यांच्या उच्चाधिकार समिती, राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय तसेच राज्यपालांच्या आदेशानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या चौकशीत या सर्व महाविद्यालयांत एआयसीटीईच्या निकषांचे पालन होत नसल्याचे तसेच त्यांनी खोटे अहवाल पाठविल्याचे नमूद केले आहे. प्राचार्य व संस्थाचालकांनीच खोटी माहिती भरून पाठविल्याचा फटका हजारो विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना जसा बसला तसेच शिक्षण शुल्क समितीनेही या महाविद्यालयांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे फी वाढवून दिल्यामुळे शासनाचीही कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे जे प्राचार्य ‘एआयसीटीई’ला खोटी माहिती देत आले त्यातीलच अनेक प्राचार्य हे संबंधित विद्यापीठांच्या ‘स्थानीय चौकशी समिती’वर नेमले जातात. हे प्राचार्य ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी जातात तेथे ते खरा अहवाल काय देणार, असा सवाल ‘सिटिझन फोरम’चे प्राध्यापक सदानंद शेळगावकर व प्राध्यापक वैभव नरवडे यांनी केला. या प्राचार्यावर फौजदारी कारवाई न झाल्यास आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही ‘सिटिझन फोरम’ने दिला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी खोटी माहिती दिल्याचे नमूद केले व आगामी काळात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री शांत का?
विरोधी पक्षनेते असताना अभियांत्रिकी शिक्षणातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारे विनोद तावडे तंत्रशिक्षणमंत्री बनल्यापासून या भ्रष्ट महाविद्यालय व त्यांच्या प्राचार्यावर कारवाई करण्यासाठी कुचराई का करत आहेत, असा सवाल ‘प्रहार विद्यार्थी संघटने’चे अ‍ॅड. मनोज टेकाडे व अ‍ॅड्. विजय तापकीर यांनी उपस्थित केला. शाळाबाह्य़ मुले शोधून काढणाऱ्यांना विनोद तावडे एक हजार रुपये बक्षीस देण्यास तयार आहेत. अभियांत्रिकीच्या भ्रष्ट प्राचार्यावर फसवणुकीसाठी तावडे यांनी गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखविल्यास आम्ही त्यांना दोन हजार रुपये बक्षीस देऊ, असे अ‍ॅड. टेकावडे यांनी सांगितले.