मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६०५८ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत अखेर संपली आहे. या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून ४६ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. दरम्यान आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज, सोमवारी रात्री १२ वाजता ही मुदत संपणार असून यात तीनशे-चारशे अर्जांची भर पडण्याची शक्यता आहे. पुणे मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी औरंगाबाद मंडळाच्या ९३६ घरांच्या सोडतीला अतिशय थंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कारण दोन आठवड्यांत (९ ते २६ फेब्रुवारी) या घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ २१८ अर्ज जमा झाले आहेत.
पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांची सोडत नव्या सोडत प्रकियेनुसार आणि नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून काढली जात आहे. त्यानुसार कायमस्वरुपी एक नोंदणी प्रक्रियेस ५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ५ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान एक लाख १६ हजार ५४७ जणांनी नोंदणी केली आहे. तर रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६५ हजार ६७१ जणांनी पुणे सोडतीसाठी अर्ज भरले आहेत. पण प्रत्यक्षात यातील ४६ हजार ४०२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरत अर्ज सादर करण्याची मुदत आज, सोमवारी रात्री १२ वाजता संपणार आहे. त्यामुळे एकूण अर्जांचा आकडा फारतर ४७ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?
पुणे मंडळाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी ६०५८ पैकी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील ३०१० घरांना मात्र अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. ३०१० घरांसाठी रविवारपर्यंत २३५६ इतकेच अर्ज सादर झाले आहेत. त्यातही अंदाजे १७३७ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी आता नव्याने सोडत काढण्याची वेळ पुणे मंडळावर आली आहे. त्यानुसार ही घरे पुन्हा सोडतीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली. दरम्यान औरंगाबाद मंडळातील ९३६ घरांसाठी ९ फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. त्यानुसार दोन आठवड्यांत, ९ ते २६ फेब्रुवारीदरम्यान या घरांसाठी केवळ ५०३ अर्ज भरण्यात आले आहेत. केवळ २१८ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले असून, १३ मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.