मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. सोमवारी (१८ नोव्हेंबर) नगर येथे राज्यात सर्वांत कमी १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज असून, राज्यात किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयासह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रीय आहे. त्यामुळे श्रीनगरसह लेह, लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारत दाट धुक्यांचाही सामना करीत आहे. उत्तरेकडून राज्यात येणाऱ्या याच थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने जास्त आहे.  उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात सोमवारी राज्यात सर्वांत कमी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यासह जळगावात १३.२, नाशिक १५.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये १४.४ आणि परभणीत १४.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Elections: मुंबईत तीन लाख नवीन मतदार, मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातील गोंदियात १४.३, अकोल्यात १५.५, अमरावतीत १५.४, चंद्रपुरात १५.८, नागपूर १५.६, आणि वर्ध्यात १५.६ अशं सेल्सिअसवर पारा होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यात पुणे १४.५, सांगली १८.७, कोल्हापूर १९.७ आणि महाबळेश्वरमध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दोन दिवसांपूर्वी दक्षिणेतून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही पारा उतरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम असल्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी व्यक्त केली आहे.