मुंबई : फरारी असलेला कुख्यात गुंड अनमोल बिश्णोई याने आपल्या संघटित टोळीद्वारे दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवाट गट) माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी विशेष मोक्का न्यायालयात केला. गुन्हे शाखेने विशेष मोक्का न्यायालयात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल करून त्याद्वारे हा दावा केला.

सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गंत (मोक्का) कारवाई करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून गुन्हे शाखेने सोमवारी या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयात अटक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यात अनमोल बिश्णोई याने आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसह दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देशाने सिद्दिकी यांच्याविरोधात कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा दावा केला आहे. आरोपपत्रात एकूण २९ जणांना आरोपी करण्यात आले असून त्यापैकी २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्णोई याचा भाऊ अनमोल याच्यासह मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर या तिघांना फरारी आरोपी दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा – टाटा रुग्णालय अनुवांशिक समुपदेशन केंद्र उभारणार, निधीसाठी खासगी कंपनीशी करार

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८८ जणांचे जबाब नोंदवले असून माजी आमदार आणि सिद्दिकी यांचा मुलगा झिशान यांच्यासह एकूण १८० साक्षीदारांची यादी आरोपपत्रासह जोडण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पाच बंदुका, सहा मॅगझिन आणि ३५ भ्रमणध्वनी हस्तगत केल्याचेही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – बेस्ट उपक्रमाला कोणीही वाली नाही, महाव्यवस्थापक पद रिक्तच, तात्पुरता कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपपत्रात काय?

या गुन्ह्यात लॉरेन्स बिश्णोई याचीही प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी याआधीच न्यायालयाला सांगितले आहे. त्याचा फरारी भाऊ अनमोल एक वेगळी टोळी चालवत असून ती प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहे. बिश्णोई याची ही टोळी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्दिकी यांच्या हत्येसह अन्य काही महत्त्वाच्या फौजदारी प्रकरणांमागे अनमोल याचा हात असल्याच्या संशयावरून त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेकडे पाठवण्यात आल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनमोल याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे व त्याच्याविरोधात एप्रिलमध्ये लुकआउट नोटीस काढण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.