मुंबई : भांडुप परिसरातील बहुमजली इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरून पडून १५ वर्षांच्या मुलीचा २३ जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी सोमवारी रात्री मुलीच्या अल्पवयीन मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मुलीने अल्पवयीन मुलाला डेटिंगसाठी विचारणा केली असता त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीने मुलीला ३१ व्या मजल्यावरील टेरेसमधील टाकीवरून धक्का दिला. त्यामुळे मुलगी खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मृत मुलगी मुलुंड येथे कुटुंबियासह राहत होती. भांडुपमधील एल. बी. एस. मर्गावरील एका इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षांच्या मित्राला भेटण्यासाठी ती मंगळवारी सायंकाळी गेली होती. अभ्यासाच्या तणावामुळे तिला नैराश्य आले होते. मित्राने तिची समजूत घातल्यानंतर दोघेही खाली उतरत असताना अचानक तिने ३१ व्या मजक्यावरून खाली उडी मारली, अशी माहिती तिच्या मित्राने दिली होती.
पण तपासात तिला मित्रानेच धक्का दिल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तत्काळ तिला पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी अपमृत्युची नोंद करण्यात आली होती व प्रकरणाचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू होता. त्यानंतर भांडूप पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मंगळवारी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी केली. याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक स्वतः तक्रारदार आहेत.
आपल्याला परीक्षेत कमी गुण मिळाले असून शाळेतील मुले चिडवत असल्यामुळे आपण निराश झाल्याचे १५ वर्षीय मुलीने आरोपी मुलाला सांगितले होते. त्यावेळी मुलीने त्याला डेटिंगसाठी विचारले. पण मुलाने तिला नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी १६ वर्षीय मुलाने पाण्याच्या टाकीवरून मुलीला धक्का दिला. त्यामुळे ती इमारतीवरून खाली पडली. ही बाब तपासात उघड झाल्यानंतर भांडुप पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८ अंंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी मुलाची मंगळवारी डोंगरी बासुधारगृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी राजावाडी रुग्णालयाचाही वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मुलीच्या अंगावर विविध ठिकाणी फ्रॅक्चर असून तिचा जागीच मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.