मुंबई : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी विविध ठिकाणच्या सुमारे ५० कामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात येणार आहे.

दादरमध्ये शिवाजी पार्क मैदान परिसरात भागोजी कीर यांचे स्मारक प्रस्तावित असून त्याच ठिकाणी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने लोकार्पण व भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

या कामांचे भूमिपूजन

मुंबादेवी परिसर, तसेच महालक्ष्मी परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, ॲन्टॉप हिलमधील जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजन, माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या पदपथ (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंतीच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन; माहीम कोळीवाडा येथील अरुणकुमार वैद्य मार्गालगत पदपथ (माहीम ट्रॅफिक चौकी ते वांद्रे उदंचन केंद्रापर्यंत) सुशोभीकरणाचे भूमिपूजन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

हेही वाचा – मुंबई : उन्हाच्या झळा वाढणार

मुंबई शहरात पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. विधान भवन, लायन गेट, उच्च न्यायालयासमोर के. बी. पाटील मार्ग, फॅशन स्ट्रीट खाऊ गल्ली, बाणगंगा वाळकेश्वर, अरुणकुमार वैद्य मार्ग, माहीम रेतीबंदर समुद्रकिनारा या ठिकाणी सदर स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्यांचेही भूमिपूजन यावेळी होणार आहे.

लोकार्पण

जे. जे. उड्डाणपुलाखाली हो-हो बेस्ट बसेसमध्ये निर्मित कलादालन व वाचनालयाचे लोकार्पण; बधवार पार्क येथील फूड ट्रकचे लोकार्पण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील नगर चौक, फॅशन स्ट्रीट, ग्रँट रोड रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील ‘पिंक टॉयलेट’चे लोकार्पण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस गार्डन व सीसीटीव्ही कॅमेरा कामांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

हेही वाचा – आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील कामे

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नायगाव, वरळी, कुलाबा, माहीम, भायखळा, शिवडी, शीव (सायन) येथील पोलीस वसाहतींचे लोकार्पण आणि भूमिपूजन; कामगार कल्याण क्रीडा मंडळ येथील नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण; सर ज. जी. समूह रुग्णालयातील कॅथ लॅब यंत्रसामग्री आणि नूतनीकरण केलेल्या वॉर्डचे लोकार्पण; कामा व आल्बेस रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राचे लोकार्पण; बालसुधारगृह, उमरखाडी, डोंगरी, डेविड ससून येथील बांधकामांचे लोकार्पण; पोद्दार रुग्णालय (वरळी) येथील आधुनिकीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वरळी दुग्धशाळा आवारातील बांधकाम; मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे वाहन चालकांसाठी कक्ष नूतनीकरण कामाचे लोकार्पण; तसेच मत्स्यव्यवसाय अंतर्गत माहीम, वरळी, कुलाबा येथील कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन; हाजी अली येथील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन; मुंबई मध्यवर्ती ग्रंथालयात डिजिटल ग्रंथालय तसेच कॉम्पॅक्टर उपलब्धतेचे लोकार्पण या कामांचा यात समावेश आहे.