मुंबई : मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. या कामांच्या दर्जाची तपासणी करावी व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> केईएम रुग्णालयात प्रथम वर्षाच्या डॉक्टरकडून क्ष किरण तंत्रज्ञाला मारहाण

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सांताक्रुझ येथील भार्गव रोडच्या कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. नव्याने बांधलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत, सिमेंट निघून खडी बाहेर पडून रस्ता पुन्हा खराब झाल्याचे निदर्शनास आले होते. अशाच प्रकारे मुंबईत अन्य ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत आहेत का, कामांच्या दर्जाची तपासणी केली जाते का याकडे लक्ष वेधण्यासाठी शेलार यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. तसेच सांताक्रुझ येथील कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.