मुंबई : वेगवान, आकर्षक आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस सहा तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल केल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागले. वेगवान, आरामदायी म्हणून बिरुद असलेल्या वंदे भारतला ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ असे प्रवासी म्हणू लागले. तसेच इतर भारतीय रेल्वेप्रमाणे वंदे भारत ही विलंबाने धावण्यास सुरुवात झाल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

रविवारी गाडी क्रमांक २०७०६ सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत नियोजित वेळेच्या सहा तास उशिराने धावली. सीएसएमटीवरून दुपारी १.१० वाजता वंदे भारत सुटणार होती. परंतु, काही कारणास्तव, ही रेल्वेगाडी सायंकाळी ७.३० वाजता सुटण्याचे नियोजित केले. याबाबतची माहिती प्रवाशांना सकाळी १०.३० च्या सुमारास कळविण्यात आले.

परंतु, रेल्वेगाडी पकडण्याच्या उद्देशाने बरेच प्रवासी घराबाहेर पडले होते. ऐनवेळी रेल्वेगाडीच्या वेळेत बदल केल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन बदलण्यासाठीही वेळ मिळाला नाही. तसेच सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत नियोजित वेळेच्या ६.३० तास उशिराने सीएसएमटी येथे पोहचली. दिवाळीनिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारतच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा आणि मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा सामना करावा लागला.

सीएसएमटी-नांदेड वंदे भारत जालना रेल्वे स्थानकात ज्यावेळी पोहोचणार होती, त्यावेळेस सीएसएमटीवरून सुटली. तर, ही रेल्वेगाडी रात्री १२.४९ वाजता पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील प्रवासाचे नियोजन फिसकटले. रात्रीच्यावेळी मूळ गावी कसे पोहचायचे असा प्रश्न अनेकांसमर उभा राहिला, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. तर, काही प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकातील स्थानक व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केली.

दिवाळीला गावी जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट काढले होते. कुटुंबीयाचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसची निवड केली होती. परंतु, ऐनवेळी वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल केल्याने दोन लहान मुलांसह आमची प्रचंड गैरसोय झाली. स्थानकावर कोणतीही योग्य मदत, पर्यायी व्यवस्था किंवा अन्न पुरवठा केला नाही.

अनेक कुटुंबे वंदे भारतच्या प्रतिक्षेत होती. मानसिक आणि शारीरिक त्रासाबाबत मध्य रेल्वेने तिकिटाच्या तिप्पट भरपाई द्यावी. प्रवासातील खाद्यपदार्थासाठी भरलेल्या शुल्काची परतफेड करावी. तसेच लेखी माफी आणि रेल्वेगाडीचा विलंब होणार असल्यास, योग्य सुसंवाद आणि प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा देण्यात येण्याचे आश्वासन मध्य रेल्वेने द्यावे. – प्रदीप थुट्टे, प्रवासी.

रेक शेअरिंगमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला उशीर

नांदेड ते सीएसएमटी, सीएसएमटी ते सोलापूर, सोलापूर ते सीएसएमटी आणि त्यानंतर सीएसएमटी ते नांदेड अशा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे रेक शेअरिंग होतात. सोलापूर ते सीएसएमटी वंदे भारत सोलापूरवरून रविवारी सकाळी ६.०६ वाजता सुटण्याऐवजी सकाळी ११.०७ वाजता तब्बल ५ तास उशिराने सुटली. त्यामुळे ही रेल्वेगाडी सीएसएमटी येथे सायंकाळी ७.०५ वाजेपर्यंत पोहचली.

त्यानंतर, सीएसएमटीवरून नांदेडच्या दिशेने रवाना होईल. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वंदे भारत एक्स्प्रेसला गाय धडकल्याने, वंदे भारतचे नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक खोळंबले.