मुंबई : राज्याला २०४७ पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र’ करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेल्या ‘संकल्पचित्रात’ (व्हिजन डॉक्युमेंट) जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना ‘व्हिजन डॉक्युमेंट’चा विचार करूनच घेतला जावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.

‘व्हिजन डॉक्युमेंट’साठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून, त्यात चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या व्हिजन डॉक्युमेंट मसुदा सादरीकरण बैठकीचे आयोजन फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आले होते. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

ध्येय निश्चित असल्यानंतर ध्येय प्राप्तीचा मार्गही प्रशस्त होतो. त्या दृष्टिकोनातून विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार होत आहे. राज्याला केवळ देशातच नाही, तर जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मधील उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक विभागाने ठरविलेले उद्दिष्ट साध्य करावे. यासाठी यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि या क्षेत्रातील जगाची सद्यस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.

सर्वसामान्य जनतेने या डॉक्युमेंटच्या निर्मितीसाठी घेतलेला सक्रिय सहभागातून त्यांची राज्याच्या विकासाप्रती असलेली भावना अधोरेखित होते, असे सांगून फडणवीस म्हणाले, एका सखोल विचार प्रक्रियेतून हे व्हिजन डॉक्युमेंट तयार होत आहे. राज्य संपूर्ण विकसित होण्यासाठी राज्यासमोर असलेली आव्हाने व्हिजन डॉक्युमेंट निर्मितीच्या अनुषंगाने समोर आली आहेत. हा मार्ग खडतर जरी असला, तरी अशक्यप्राय नाही, हे सुध्दा यातून स्पष्ट झाले आहे. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून समोर येणार आहे. या बैठकीत कृषी, नगर विकास, गृह, सांस्कृतिक कार्य, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन, सामान्य प्रशासन (सेवा), परिवहन व बंदरे, सार्वजनिक बांधकाम या विभागांचे सादरीकरण झाले.