गणेशोत्सवात देखाव्यावरून वाद झालेले असतानाच आता लोअर परळ येथे गणेशोत्सवातील बॅनरवरून भाजप व शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. गणेशोत्सवानिमित्त भाजपने लावलेला बॅनर फाडण्यात आला असून त्याप्रकरणी स्थानिक युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजपने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लोअर परळमधील दैनिक शिवनेरी मार्ग येथील श्रीराम मिल रविराज बस थांब्याजवळ बॅनर लावला होता. युवासेना पदाधिकारी संकेत सावंत यांनी कार्यकर्त्यांना जमवून हा बॅनर फाडल्याची तक्रार ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोमवारी रात्री ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी भादंवि कलम १४३ (बेकायदेशीर जमाव जमा करणे) व ४२७ (किरकोळ मालमत्तेचे नुकसान करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : म्हाडा सोडतीत बदल? आता तपासली जाणार अर्जदारांची पात्रता!

संतोषकुमार पांडे यांच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, ही घटना रविवारी घडली. रविराज जंक्शन येथील भाजपचा बॅनर फाडण्यात आला असून युवासेना पदाधिकारी संकेत सावंत आणि पदाधिकाऱ्यांनी जमाव जमवून तो फाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : शिवसेनेला भुईसपाट करा! – उद्धव ठाकरे लक्ष्य : शहा यांचे भाजप नेत्यांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळी व लोअर परळचा काही भाग वरळी विधानसभा मतदारसंघात येतो. वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेना नेते आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. दहिहंडी उत्सवानंतर आता गणेशोत्सवाचे निमित्त साधून दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या करण्यात येत आहेत. त्यातूनच रविवारी ही घटना घडल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.