मुंबई: धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेचा लाभ घेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना ठाण्यातील गुरूकृपा रुग्णालयाचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले होते. याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करीत गाव-खेड्यातून कर्मचाऱ्यांना परदमोड करून ठाणे शहरात यावे लागत होते. आरोग्य प्रमाणपत्र कुठूनही घेतले तरी चालत असताना ठाण्यातीलच रुग्णालयावर सरकारची ‘कृपा’ कशासाठी असा सवाल केला असता करीत चौकशी व कारवाईची मागणी केली असता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ चाचण्यांची धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू केली. या योजनेतून मिळालेल्या प्रमाणपत्रावर कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीचे तीन हजार रपये दिले जात होते. मात्र या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा तारांकित प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रताप सरनाईक म्हणाले, राज्यात आरोग्य विभागाच्या धोरणानुसार ही योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार ११ चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्या जातात. ४० ते ५० वयोगटातील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा तर ५० ते ५८ वयोगटातील कर्मचाऱ्यांची वर्षातून दोनदा चाचणी केली जाते. चाचण्यांसाठी सरकारच्यावतीने ठाण्यातील गुरुकृपा रुग्णालयातील डॉ. किरण पंडित यांना २ कोटी ६५ लाख रुपयांचे बिल सरकारने दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर विरोधी व सरकारी बाकावरील आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. कायद्यात बदल करून परिवहन महामंडळ किरण पंडित नावाच्या डॉक्टरपुढे पायघड्या का घालत आहे? या एकाच डॉक्टरचे प्रमाणपत्र आणण्यासाठी कर्मचा-यांवर सक्ती का केली जात आहे, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. दरम्यान, परिवहन विभागाची १० हजार कोटींची बिले प्रलंबित असताना या डॉक्टरच्या प्रमाणपत्राची सक्ती कशासाठी? नांदेड, सांगली, रत्नागिरी या भागात विशेष युनिट स्थापन करण्यात आली आहेत. मग एकावर सरकारची कृपा कशासाठी, असा सवाल दानवे यांनी केला. यावर भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले. याला उत्तर देताना परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच डॉक्टरच्या सर्टिफिकेटसाठी दबाव टाकू नये. असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. कोणीही एकाधिकारशाहीने असा निर्णय घेत असेल तर तरीही असा प्रकार घडला असेल तर चौकशी करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.