राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचे केलेल आवाहन, यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. तर, मनसेने हिंदुत्वाच्या मुद्दा आक्रमकतेने हाती घेतल्यापासून मनसे ही भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याच्या प्रतिक्रिय उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हनुमान चालीसा हा देखील भाजपाचाच कार्यक्रम असल्याच म्हटलं जात आहे. यावर आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया दिली.

“भाजपाने अधिकृतरित्या हनुमानाचा कुठलाही कार्यक्रम हाती घेतलेला नाही. पण हनुमान चालीसा म्हणायला जर तुम्ही कोणाला थांबवणार असाल, हिंदू देव-देवता किंवा हिंदूंच्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जर गदा आणणार असाल, तर त्याच्या बाजूने भाजपा उभा राहील. पण हनुमान चालीसा हा भाजपाने घोषित केलेला कार्यक्रम नाही.” असं शेलार यांनी स्पष्ट केलं.

आमच्या दोन नाही तर तीन पिढ्या यासाठी खपल्या आहेत –

हिंदू संघटनासाठी १९९० च्या दशकापासून आजपर्यंत प्रभू रामचंद्र हा महत्वाचा मुद्दा राहीला आता त्यामध्ये हनुमानाची देखील भर पडते आहे का? कारण अचानक हे प्रकरण समोर येताना दिसत आहे. मूळात या सगळ्या विषयाची गरज का वाटावी? या प्रश्नावर आशिष शेलार यांनी उत्तर देताना सांगितले की, “मूळात असं आहे की, प्रभू रामचंद्र हा आमच्या आस्थेचा विषय आहे. भाजपा तर यामध्ये खूप नंतर उतरला, कारण या संदर्भातील आंदोलन, लढे आणि लढाया याचा पूर्व इतिहास आहे, तो सगळा मी काही आता मांडत नाही. केवळ आधुनिक भारतामधील विषय घ्यायचा असेल तर विश्व हिंदू परिषद, साधू-संतांच्या संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हा त्या आधीपासूनचा आहे. आमच्या दोन नाही तर तीन पिढ्या यासाठी खपल्या आहेत. मोरोपंत पिंगळे, अशोकजी सिंघल यांनी केलेलं योगदान त्याग आणि बलिदान धुवून निघू शकत नाही. म्हणून जे खोलवर हिंदू संघटनेच्या आणि आस्थेच्या विषय असलेल्या राम मंदिरासाठी जे दोन-तीन पिढ्या खपवून, बलिदान करून दिलं याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपा नियोजित या कार्यक्रमात उतरला आणि त्या कार्यक्रमात आम्ही उतरलो याचं कारण पुन्हा, निवडणुकीत आमच्या जागा किती वाढतील? हा विचार न करता. ती त्या काळातील आवश्यकता देशाच्या अस्मितेची होती, म्हणून आम्ही त्यामध्ये उतरलो. हा झाला राम मंदिराचा विषय, आता न्यायालयाच्या आदेशानंतर राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. काही जणांनी राम वर्गणीवरून, राम मंदिराच्या जागेवरून देखील टिंगल-टवाळी केली. विश्वव्यापी बोरूबहाद्दर रोज त्यावर काही ना काही लिहीत देखील असतात, पण यावर मी आता काही बोलणार नाही.”

भाजपाला दुसऱ्याच्या तोंडून काही वदवून घेण्याची गरज आहे, असं काही वाटत नाही –

तसेच, मनसे हा भाजपाच्या कार्यक्रमपत्रिकेचा प्रवक्ता म्हणून काम करतेय ही जी टीका होतेय यावर तुमचं मत काय? या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, “टीका या होणारच, टीका करण्याचा लोकाशाहीत सर्वांना अधिकार आहे. अशा पद्धतीचे जे काही आरोप केले जातात की भाजपा दुसऱ्याच्या तोंडून काही गोष्टी वदवून घेतो, हे मला अजिबात मान्य नाही. मी सपशेल फेटाळतो. याचं कारण राम मंदिराच्या बाबत आम्हाला भूमिका घ्यायची होती, आम्ही थेट भूमिका राम मंदिराच्या बाबतीत घेतली. राम सेतूच्या बाबत आम्हाला जी भूमिका घ्यायची होती, आम्ही थेट राम सेतूच्या बाबत भूमिका घेतली. आम्हाला कलम ३७० बाबत भूमिका घ्यायची होती. समान नागरी कायद्या, सीएए बाबत आमचं म्हणणं आम्ही थेट मांडलं. भाजपाला दुसऱ्याच्या तोंडून काही वदवून घेण्याची गरज आहे, असं काही वाटत नाही. मनसेच्या कार्यक्रमाबाबत बोलायचं झालं तर तो त्यांचाच सर्वस्वी कार्यक्रम आहे. पण लोक दबक्या आवाजात हे देखील म्हणताय, की कुठंतरी हे देखील चित्र दिसायला लागलं आहे की, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला घेरण्यासाठी राष्ट्रवादी तर काहीना काही अशा पद्धतीचे कार्यक्रमाच्या परवानग्या आणि त्यातून एक विषय पेरण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत नाही ना? ही देखील चर्चा आहे.”