मुंबई : बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंगळवारी विविध रिपाइं गटांचे नेते आणि कार्यकर्ते यांनी मेट्रो चित्रपट गृह ते आझाद मैदान असा मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन केले. रिपाइं गटांनी मतभेद विसरून बौद्ध समाजाच्या प्रश्नाविषयी एकत्र यावे, अशी हाक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
बिहारच्या बीटी ॲक्ट १९४९ कायद्यामध्ये सुधारणा करा, अशा घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. मोर्चाचे नेतृत्व मंत्री रामदास आठवले यांनी केले. मोर्चामध्ये मुंबई महानगर क्षेत्र परिसरातून रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आंदोलनाचे आयोजन केल्यामुळे मोर्चाला सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आझाद मैदानात दुपारी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. देशातील विविध धर्मियांची प्रार्थना स्थळे ज्या न्यासच्या हाती आहेत, त्यावर त्याच धर्मातील विश्वस्त काम करतात. मग हा न्याय बौद्ध धर्मीयांना का लागू नाही? गौतम बुद्धांना जेथे ज्ञान प्राप्ती झाली, त्या स्थळी उभारण्यात आलेल्या महाविहारचे व्यवस्थापन हिंदू धर्मियांचे हाती का, असा संतप्त सवाल सभेतील सर्वच वक्त्यांनी केला.
यावेळी आठवले यांनी रिपाइं एकीकरणाचा विषय छेडला. एकीकरणासाठी आंबेडकर कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी गेले सहा महिने बोधगया येथे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध तालुक्यांमध्ये मोर्चे काढण्यात आले आहेत. त्या संदर्भातला राज्यव्यापी मोर्चा आज मुंबईत निघाला.
मोर्चामध्ये भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते विनाचार्य, भदंत हर्षबोधी आकाश लामा हे बौद्ध भिक्कू सहभागी होते. तसेच खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार संजय बनसोडे, आमदार बालाजी किणीकर, प्रा.जोगेंद्र कवाडे, डॉ.राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, सुरेश माने, सीमा आठवले, सुलेखा कुंभारे, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर आदी नेते सहभागी झाले होते.
बिहारने बीटी कायद्यात सुधारणा करावी यासाठी मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची भेट घेतली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथे जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयु आणि भाजपा महागठबंधनचे सरकार आहे.
आंदोलन कशासाठी?
१९४९ चा बीटी कायदा म्हणजे बोधगया मंदिर कायदा जो बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी लागू करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत, बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती (बीटीएमसीटी) स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये हिंदू सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद आहे. बौद्ध धर्मियांचे प्रार्थना स्थळ असताना या न्यायावर हिंदू सदस्य का, असा बौद्धांचा सवाल आहे. जगभरातील बौद्ध धर्मगुरूंनी सहा महिन्यापासून बोधगया येथे आंदोलन सुरू केले आहे.