मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठांसह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी याची ठाणे मनोरुग्णालयात मानसिक स्थिती तपासण्याचे आदेश दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी दिले. चेतन हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तसेच, त्याला उपचारांची आणि मानसिक रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याच्या अकोला येथील कारागृह प्रशासनाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाने हे आदेश दिले.

चेतन याला अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून त्याच्यावर सध्या दिंडोशी सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरूवातीला अकोला कारागृह अधीक्षकांनी दिंडोशी सत्र न्यायालयाला पत्रव्यवहार केला होता. त्यात, चेतन याची प्रकृती १९ डिसेंबर रोजी बिघडली होती. त्यामुळे, त्याला वैद्यकीय उपचारांसाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याच्यात मानसिक आजाराची लक्षणे आढळून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच, चेतन याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केल्याचे कारागृह अधीक्षकांनी पत्रात म्हटले होते.

हेही वाचा >>>मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या सांगतेला व्याकरणाची सुरुवात

तथापि, गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने कारागृह अधीक्षकांच्या दाव्याला मागील सुनावणीच्या वेळी विरोध करण्यात आला होता. तसेच, चेतन याच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तो मानसिकरीत्या आजारी असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. किंबहुना, त्याच्या वैद्यकीय अहवालानुसार तो निरोगी असून मानसिक रुग्ण नसल्याचेही मृतांच्या कुटुंबीयांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले व अकोला कारागृह अधीक्षकांचे पत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, चेतन याला ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करता येऊ शकते. त्याच्यावरील खटल्याचा विचार करताही ते सोयीचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.

हेही वाचा >>>मुंबई : भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात उभारणार नवीन सर्पालय, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांचे म्हणणे मान्य करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चेतन याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी त्याला ठाणे येथील मनोरुग्णालयात पाठवण्याचे आदेश दिले. चाचणीदरम्यान त्याला तेथेच ठेवण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. अकोला कारागृहातून चेतन याला सुनावणीसाठी हजर करणे कारागृह अधिकाऱ्यांना कठीण जाते. शिवाय, इंटरनेट नेटवर्कचीही तेथे समस्या आहे. परिणामी, चेतन याला दूरचित्रसंवादाच्या माध्यमातूनही न्यायालयात उपस्थित केले जात नाही. या सगळ्यांचा विचार करता कारागृह प्रशासनाच्या आणि आरोपीच्या सोयीसाठी चेतन याला वैद्यकीय तपासणीकरिता ठाण्यातील मानसिक रुग्णालयात पाठवणे इष्ट असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले. तसेच, चेतन याला अकोलाहून ठाणे येथे पोलीस बंदोबस्तात आणण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.