मुंबई : आयुष्यात शिकण्याची जिद्द, सामाजिक जाणीव आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातील कृष्णा गिंभल या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. दुर्गम भागातील गाव, खडतर रस्ते व सोयीसुविधांची वानवा असूनही कृष्णाने ‘नीट’चे स्वप्न पाहिले आणि यशस्वी भरारीही घेतली. राष्ट्रीय चाचणी कक्षाने घेतलेल्या वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेत (नीट २०२५) ७२० पैकी ४१७ गुण कृष्णाला मिळाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभलोण गावात राहणाऱ्या कृष्णा गिंभल याचे वडील अल्पभूधारक शेतकरी आणि आई गृहिणी आहे. दोन भाऊ आणि एक बहीणही आहे. सुरुवातीला कृष्णाने डॉक्टर, शिक्षक किंवा पोलिस अधिकारी या तीन करिअर मार्गांचा विचार केला होता. परंतु एक दिवस शासकीय आरोग्य शिबिरात कृष्णा गेला. तेव्हा संपूर्ण भागात फक्त दोन एमबीबीएस डॉक्टर असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच तालुका पातळीवर मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि ग्रामीण भागासह आदिवासी समुदायातील डॉक्टरांची संख्याही खूप कमी असल्याचे त्याला कळले. दुर्गम भागातील रुग्णांना उपचारांसाठी दूरवर मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरातील रुग्णालयांमध्ये जावे लागते, हे त्याने पाहिल्यावर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले.
विनवल येथील शासकीय आश्रमशाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कृष्णाला ‘नीट’चे वेध लागले आणि त्याने सर्वप्रथम २०२४ साली ‘नीट’ दिली. मात्र या प्रयत्नात त्याला काहीसे कमी गुण मिळाले आणि त्याने पुन्हा नीट देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कृष्णाला मार्गदर्शनाची गरज भासली. आर्थिक संकटही डोळ्यांसमोर होते. मात्र विनवल येथील शासकीय आश्रमशाळेच्या तत्कालीन प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांनी ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’च्या पुण्यातील टीमला कृष्णाबद्दल महिती दिली.
त्यानंतर या उपक्रमासाठी कृष्णाने अर्ज केला आणि मोबाईल फोनवरून मुलाखत देऊन पात्र ठरला. मग पुण्यात राहून कृष्णाने ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या उपक्रमाअंतर्गत रात्रंदिवस मेहनत घेत तयारी केली आणि आता २०२५ च्या नीटमध्ये यशस्वी झाला असून त्याला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे जवळपास निश्चित आहे.
‘आजघडीला शहरांमध्ये डॉक्टरांची संख्या प्रचंड आहे. मात्र दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरता भासते, हे चित्र मला बदलायचे आहे. माझ्या गावाची, तालुक्याची आणि गरजवंतांची सेवा करायची आहे. ‘नीट’च्या प्रवासात लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटच्या सर्व मंडळींनी उत्तम मार्गदर्शन केले आणि कुटुंबियांनीही खंबीरपणे पाठिंबा दिला’, असे कृष्णा गिंभल याने सांगितले.
‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ उपक्रम काय आहे?
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. अतुल ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक भान जपत २०१५ साली ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ ही संस्था सुरू केली. पैशांअभावी ‘नीट’ परीक्षेची तयारी करू न शकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाते. तर मेळघाट व गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी धाराशिवमध्ये मोफत निवासी व्यवस्था करून मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ४५० पैकी ३०० विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यंदा ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या उपक्रमाअंतर्गत एकूण ७१ विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते, यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३० विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या यशाबद्दल ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’चे कार्याध्यक्ष हरीश खानवरे म्हणाले की, ‘हे यश आमच्या टीमच्या सामूहिक मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीमुळे शक्य झाले. यामुळे कुटुंब व पिढ्या उभ्या राहत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे’.