मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आणि त्याला रेल्वे प्रशासनाने ना हरकरत प्रमाणपत्रही दिले तरी या पुलाचे उद्घाटन का होत नाही याबाबत सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र ब्रिटिश गव्हर्नरच्या नावाने असलेल्या या पुलाचे नाव बदलून नवीन नाव देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. नवीन नाव कोणते द्यायचे त्याबाबत अद्याप निर्णय न झाल्यामुळे या पुलाचे उद्घाटन रखडल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मात्र उद्घाटन न झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पूल आणि विक्रोळी येथील पूल सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांना शहर भागातील कर्नाक पूल कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. विक्रोळी पूल व कर्नाक पूल हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. त्यापैकी विक्रोळी पूल सुरू झाला तरी कर्नाक पूल मात्र अद्याप वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. १० जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते, मात्र जुलै महिना उजाडला तरी हा पूल सुरू केला जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.
आधी या पुलाची भार चाचणी करायची होती म्हणून पूल सुरू केला जात नव्हता. मग पुलावरची रंगरंगोटी शिल्लक होती म्हणून पूल सुरू होत नव्हता. त्यानंतर रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते म्हणून पूल सुरू होत नव्हता. मात्र आता भार चाचणी यशस्वी झाली, रंगरंगोटीही झाली, रेल्वेचेही ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तरी या पुलाचे उद्घाटन का होत नाही याबाबत सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेच्या पूल विभागानेही पूल सुरू करण्यास हरकत नसल्याचा अहवाल पालिका प्रशासनाकडे दिला आहे. मात्र तरीही पूल सुरू होत नसून पूल का सुरू होत नाही याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु, राज्य सरकारलाच या पुलाचे नाव बदलून रितसर उद्घाटन करायचे आहे असे समजते.
विक्रोळी पूल उद्घाटन सोहळ्याशिवायच सुरू करण्यात आला होता. पावसाळयाचे दिवस असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल १४ जून रोजी खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र कर्नाक पूल तयार असतानाही अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधानसभेतही याबाबत कॉंग्रेसचे स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अमीन पटेल यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, उद्घाटनासाठी इतका वेळ का घेतला जातो, हे समजत नाही. चेंबूर आणि अन्य पूर्व उपनगरांना जाणाऱ्या वाहतुकीवर याचा प्रतिकूल परिणाम होतो आहे. तसेच बुधवारी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र येऊन या पुलाच्या ठिकाणी आंदोलनही केले. तरीही या पुलाच्या उद्घाटनाची घोषणा होत नसल्यामुळे उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. मात्र या पुलाचे राज्य सरकारला नाव बदलायचे असल्याचे खात्रीलायक सूत्राकडून समजते.
नामकरणाबाबत गुप्तता
कर्नाक हे एका ब्रिटिश गव्हर्नरचे नाव असून ते बदलण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्याकरीता चांगल्या नावाची निवड केली जाणार आहे. हे नाव ठरले की उद्घाटनाची घोषणा होईल अशी शक्यता आहे.अजून तरी या पुलासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने नाव सुचवणारी मागणी केलेली नाही किंवा पत्र दिलेले नाही. त्यामुळे नाव बदलण्याच्या निर्णयाबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. मात्र या नावाच्या शोधासाठी वेळ लागत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे. संध्याकाळी मोहम्मद अली रोडवरून पूर्व मुक्त मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागतात. पूल खुला न केल्यामुळे अनावश्यक मोठा फेरा घालावा लागत असून वेळ वाया जात असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पूल पाडून टाकला. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.
मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीसाठी प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (गर्डर) स्थापित करण्यात आल्या आहेत.
काम वेगाने पूर्ण केले, पण उद्घाटनासाठी विलंब
या पुलाचे काम वेगाने पूर्ण केल्याचा दावा पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. पुलाची पहिली तुळई ऑक्टोबर २०२४ रोजी आणि दुसरी तुळई जानेवारी २०२५ रोजी बसवण्यात आली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात हा पूल उभा केला. वाहतूक पोलीस विभागाच्या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज २४ तास पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे.