Monsoon 2025 in Maharashtra : यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली असली तरी तूर्तास त्यांची गती सध्या मंदावली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत, त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

यंदा नैऋत्य मोसमी वारे वेगाने वाटचाल करत केरळ बरोबरच महाराष्ट्रातही अंदाजित वेळेच्या आधीच दाखल झाले. लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र, मोसमी पावसाची गती मंदावली. राज्यात २८ मेपासून मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली आहे.

अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली आहे. मोसमी वाऱ्यांनी २८ मे रोजी मुंबई, अहिल्यानगर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मंदावला. परिणामी, राज्यातील मोसमी पावसाचा प्रवासही मंदावला आहे.

मोसमी वाऱ्यांची सीमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अलिदाबाद, भवानीपटना, पूरी आणि बालूरघाट भागात होती. दरम्यान, राज्यातही मागील चार – पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. मात्र, इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागत आहे.

पूर्व विदर्भात पावसाची शक्यता

मोसमी पावसाची गती मंदावली असली तरी, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत ८८१.६ मिमी पाऊस

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याअगोदर वळवाच्या पावसाने जोर धरला होता. मात्र मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानातही सध्या चढ – उतार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.