मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा ताप वाढला आहे. अनेक भागात तापमानाचा पारा ३५ अंशापुढे गेला आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात सोमवारी सायंकाळी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी रायगड, रत्नागिरी, ठाणे याचबरोबर संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईबरोबरच इतर भागातही सारखीच परिस्थिती आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमान ३३-३५ अंतापर्यंत नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.४ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मुंबईतही पुढील दोन – तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने तापमानाच्या पाऱ्यात घट होऊन दिलासादायक वातावरण अनुभवता येईल. दरम्यान, मंगळवारी सायंकाळनंतर हवामान विभागाने मुंबईसह ठाण्यात पावसाचा इशारा दिला. त्यानुसार सायंकाळी फोर्ट, दादर, परळ पवई तसेच आसपासच्या परिसरात हलक्या सरींनी हजेरी लावली.

नवी मुंबई, ठाणे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस

नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर, खारघर, तसेच ठाण्यात मंगळवारी दुपारी ४ नंतर मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. यावेळी जोरदार वारे वाहत होते. साधारण अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू होती.

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

ब्रह्मपुरी येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर येथे ३३.६ अंश सेल्सिअस, लोहगाव ३४.५ अंश सेल्सिअस, रत्नागिरी ३६ अंश सेल्सिअस आणि डहाणू येथे ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.