मुंबई : गेल्या तीन वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विविध पक्षातील तब्बल १२३ नगरसेवकांनी प्रवेश केल्याचा दावा शिवसेनेने (शिंदे) केला आहे. यामध्ये भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांचा समावेश असून सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे (ठाकरे) असल्याचा दावा शिवसेनेने (शिंदे) केला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांत मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केवळ शिवसेनेतील (ठाकरे) माजी नगरसेवकांची संख्या मोठी होती. मात्र नंतर कॉंंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी या पक्षांतील माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने आधीपासूनच मुंबईतील २२७ प्रभागांसाठी उमेदवार उभे करण्याकरीता तयारी केली होती. ठाकरे यांचे अनेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात येत आहेत. दर आठ – पंधरा दिवसांनी पक्षप्रवेश होत आहेत. त्यात काही माजी नगरसेवक २०१७ चे, तर काही त्याआधीच्या काळातील आहेत.

सुरुवातीच्या काळात शिवसेनेतील ( ठाकरे) माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, वैशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, दिलीप लांडे, संतोष खरात, परमेश्वर कदम, आत्माराम चाचे, अमेय घोले, माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आदींचे पक्षप्रवेश झाले. त्यानंतर २०१७ च्या आधीचे माजी नगससेवकही शिंदे यांच्या पक्षात गेले. मग कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या माजी नगरसेवकांनीही शिंदे यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेला (शिंदे) मुंबईत जम बसवायचा असल्यामुळे जास्तीत जास्त माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश पार पडले आहेत.

ठाकरे यांचे ७६ माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात ?

गेल्या तीन वर्षात विविध पक्षांतील १२३ नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आले असून त्यात सर्वाधिक ७६ माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील असल्याचा दावा पक्षाने केला आहे. हे नगरसेवक २००२ पासून ते २०१७ च्या कार्याकाळातील आहेत. २०१७ -२२ या काळातील तब्बल ५९ नगरसेवकांनी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात ठाकरे यांचे सर्वाधिक ४४ नगरेसवक आहेत. तर २०१२ ते २०१७ या कार्यकाळातील ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा शिवसेनेने (शिंदे) केला आहे.

दरम्यान, दर आठ- पंधरा दिवसांनी होणारे शिवसेनेतील (शिंदे) प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश थांबले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील पक्ष प्रवेशांना ओहोटी लागल्याची चर्चा सुरू आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पालिकेच्या निवडणुकीत या दोन बंधुंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो, असा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मराठीच्या मुद्द्यावर का होईना, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे. बेरजेच्या राजकारणाचा दोघांनाही फायदा होईल. किमान मुंबईत तर नक्कीच फायदा होईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिंदे यांच्याकडे गेलेले अनेक माजी नगरसेवक, आमदार आमच्या संपर्कात असून परत येऊ इच्छितात, असा दावाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते करीत आहेत.