मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवासी वाढल्याने त्या डब्यातील तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत केंद्रिय तिकीट तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यातून १६ जून ते २४ जून या कालावधीत १०३ गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी ९८४ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ३.१८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत अनधिकृत, विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याने याबाबत सातत्याने मध्य रेल्वेकडे तक्रारी दाखल होत होत्या. त्यामुळे मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथके, आरपीएफ कर्मचाऱ्यांसह गर्दीच्या वेळेत लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये पथक तैनात करण्यात आले. प्रत्येक पाळी (शिफ्ट)मध्ये सरासरी ४१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ७ आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनियोजित तपासणी करण्यात आली.
या उपक्रमाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ज्या लोकलमध्ये तपासणी केली जात होती. त्या लोकलमध्ये अनियमित प्रवाशांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. तपासणी कालावधीत प्रथम श्रेणीत अनियमित प्रवासाशी संबंधित तक्रारींमध्येही लक्षणीय घट झाली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
अनेक प्रथम श्रेणीतील प्रवाशांनी रेल्वेच्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले आणि अनेकांनी अनधिकृत प्रवाशांची ओळख पटवून देण्यात आणि दंड वसूल करण्यात तैनात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. सर्व प्रवाशांना योग्यरित्या तिकिटे किंवा पास घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेद्वारे करण्यात आले
सकाळी गर्दीच्यावेळी कल्याण ते सीएसएमटी, कल्याण ते ठाणे, अंबरनाथ ते दादर, बदलापूर ते दादर, ठाणे ते दादर, ठाणे ते पनवेल, पनवेल ते कुर्ला आणि सायंकाळी सीएसएमटीवरून सुटलेल्या कल्याण, टिटवाळा, ठाणे, बदलापूर, पनवेल या लोकलमध्ये सखोल तपासणी केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरमार्गावरील लोकलमध्ये सखोल तपासणी झाली. याद्वारे विनातिकीट प्रवाशांना रोखून, तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.