मुंबई : यंदा मुंबईत मोसमी पाऊस वेळेआधी दाखल होऊनही मुसळधार पाऊस बरसत नसल्याने चिंता व्यक्त होत असतानाच गेल्या काही दिवसांत राज्यासह शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उणा ठरत असलेला शहरातील पावसाचा आकडा आता अधिक झाला आहे. मुंबईतील पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली असून शहर भागांत सरासरीच्या तुलनेत ४९.७ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. जून महिन्यातील काही चार ते पाच दिवसांची आकडेवारी पाहता या दिवसांत पडलेल्या पावसामुळे जूनची सरासरी ओलांडली आहे. पुढील काही दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

मुंबईत यंदाचा उन्हाळा अतितीव्र ठरला. कमाल तापमान यंदा ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यंदा मुंबईत मोसमी पाऊस १५ दिवस अगोदरच दाखल झाला. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत पावसाने काहिशी उघडीप दिली. अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत होत्या. मात्र जूनच्या पंधरा तारखेनंतर पुन्हा पावसाने काहीसा जोर धरला होता. धरण क्षेत्रातही याच कालावधीत पाऊस झाला. साधारण ७ जून रोजी १०२ मिमी, १६ जून ८६ मिमी, २० जून १०० मिमी, २४ जून रोजी ६१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. जून महिना शहरात पावसाचे सातत्य नसले तरी अधून मधून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महिन्याची सरासरीचे आकडे गाठले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते ३० जूनपर्यंत ५९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत येथे ५४२.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. सरासरीच्या तुलनेत ४९.७ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. याचबरोबर सातांक्रूझ केंद्रात ५१२.७ मिमी पावसाची नोंद झाली. येथे सरासरीच्या तुलनेत २४.४ मिमी पाऊस कमी पडला आहे. सांताक्रूझ केंद्रात १ ते ३० जून या कालावधीत ५३७.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मोसमी वारे दाखल झाल्यानंतरही पावसाचा जोर नव्हता. त्यामुळे मोसमी पाऊस सरासरी भरुन काढणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, १५ जूनपासून पुढील काही दिवस अधूनमधून मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतरही काही दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे सरासरीचे आकडे झपाट्याने बदलले. १ जूनपासून २० जूनपर्यंत मुंबईचा पाऊस सरासरीत मागे पडला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने महिन्याच्या सरासरीतली तूट भरून काढली.