करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आता अवघ्या काहीच तासांत भाविकांसाठी खुली होणार आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्या (७ ऑक्टोबर) राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिरही उद्यापासून भाविकांसाठी पुन्हा खुलं केलं जाईल अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने दिली आहे.

अशी करा नोंदणी

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. “भाविकांना गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश दिला जाईल. मात्र, या प्रवेशासाठी भाविकांना श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अ‍ॅपवर QR कोड प्री-बुकिंग करणं अनिवार्य असेल”, अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली. त्याचसोबत, “दर तासाला फक्त २५० भाविकांनाच दर्शनासाठी QR कोड दिला जाईल”, असंही सांगण्यात आलं आहे.

नियमांचं पालन अनिवार्य

राज्यातील भाविकांसाठी धार्मिकस्थळं जरी खुली करण्यात येत असली तरीही करोनाचा धोका टळलेला नसल्याने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होणं अत्यंत आवश्यक असणार आहे. याविषयी आदेश बांदेकर म्हणाले की, “मंदिरात भाविकांना मास्क घालणं, शारीरिक अंतर राखणं अशा सर्व करोनाप्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करावं लागेल. त्याचप्रमाणे, थर्मल स्कॅनिंगनंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपासून सुरु होणार QR कोड नोंदणी

“श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अ‍ॅपवर आज म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी QR कोड नोंदणी करता येईल. त्यानंतर, दर गुरुवारी अ‍ॅपवर भाविकांना पुढील आठवड्यासाठी नोंदणी करता येईल”, असंही आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.