मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप स्थानक, विद्याविहार स्थानक, सायन – माटुंगा दरम्यानचा रेल्वे मार्ग, विक्रोळी – कांजूरमार्ग दरम्याचा रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वेचा शिवडी – वडाळा मार्ग, कुर्ला स्थानक, कुर्ला – मानखुर्द मार्ग, गुरू तेगबहादूर नगर – चुनाभट्टी, कुर्ला – टिळक नगर याठिकाणी पाणी भरले होते त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि गर्दीच्यावेळी रेल्वे सेवा पूर्णत: ठप्प झाली. यामागे नक्की कोणती कारणे होती याचे उत्तर शोधण्यासाठी पालिका प्रशासनाने सोमवारी पालिका मुख्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

मुंबई महानगरात बुधवारी २५ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासात २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सुविधा बाधित झाली. रेल्वे मार्गावर पाणी साचण्याच्या घटना घडल्याने मध्य रेल्वेची सेवा प्रभावित झाली. उपनगरातील घरी परतणारे अनेक नोकरदार मुंबईत विविध स्थानकांवर अडकून पडले होते. संपूर्ण मुंबई काही मिनिटांत ठप्प झाली होती. नोकरदारांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. पावसामुळे मुंबईतही रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पाणी का साचले याचा अभ्यास करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने पर्जन्यजलवाहिन्या विभागाला दिल्या होत्या. सोमवारी पालिका मुख्यालयात या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीत रेल्वे रुळांवर पाणी का साचले आणि रेल्वे ठप्प का झाली हा विषय केंद्रस्थानी ठेवून चर्चा करण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेल्वे प्रशासन, महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पूल विभाग आणि रस्ते विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोहमार्गांवर पाणी साचण्याच्या घटनांना प्रतिबंध करणे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखणे या विषयावर सखोल चर्चा झाली. लोहमार्गावरील पाणी साचण्याची ठिकाणे आणि त्यावर उपाययोजनांची स्थळानुसार चर्चा झाली. त्यात मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप स्थानक, विद्याविहार स्थानक, सायन – माटुंगा दरम्यानचा रेल्वे मार्ग, विक्रोळी – कांजूरमार्ग दरम्याचा रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वेचा शिवडी – वडाळा मार्ग, कुर्ला स्थानक, कुर्ला – मानखुर्द मार्ग, गुरू तेगबहादूर नगर – चुनाभट्टी, कुर्ला – टिळक नगर आदी ठिकाणांचा समावेश आहे. ज्या रेल्वेस्थानकात पाणी भरले होते. त्या ठिकाणी स्थळनिहाय कोणती कार्यवाही केली पाहिजे, याची निश्चिती या बैठकीत करण्यात आली. काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील भाग अरुंद असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची विनंती रेल्वे विभागाने केली. त्यापैकी काही कामे रेल्वे विभागाने दिलेल्या निधीतून करण्यात येणार असून, काही कामे महानगरपलिकेने करावीत, अशी विनंतीही रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच काही भागांमधील रेल्वे भाग वगळता निवासी भागातील पावसाळी जलवाहिनी जाळ्यांचे विस्तारीकरणाची बाब रेल्वे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली.

महानगरपालिकेतर्फे करावयाच्या कामांची यादी विना-विलंब तयार करुन त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरु करावी. शक्यतोवर पुढील पावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करावीत. रेल्वे रुळाखालील बंदीस्त मार्गाचे विस्तारीकरण करताना पारंपरिक पद्धतीने अथवा मायक्रो टनेलिंग करण्याबाबत स्थळपरत्वे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

शिवडी वडाळात कचऱ्यामुळे पाणी साचले

हार्बर मार्गावरील शिवडी वडाळ्यात दरम्यानच्या नाल्यात आजूबाजूच्या झोपड्यांमधून कचरा टाकला जात असल्यामुळे हे नाले तुंबतात. त्यामुळे या स्थानकांवर पाणी भरल्याचे यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील नाले बंदिस्त करता येतील का यावरही विचार विनिमय करण्यात आला.

हेही वाचा – महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बस सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोहमार्गावर पाणी साचण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी बाळगावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. अतिवृष्टीच्यावेळी उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहण्याकामी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने कार्यरत राहिले पाहिजे. नाल्यातील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे केवळ पावसाळापूर्व अथवा पावसाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर सुरू राहिली पाहिजेत, असेही निर्देश त्यांनी दिले.