मुंबई : वाढत्या नागरीकरणांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक जीवाची पर्वा न करता उपनगरीय रेल्वेला लटकून प्रवास करीत असून गेल्या तीन वर्षात विविध दुर्घटनांमध्ये तब्बल ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ठाणे-कल्याण दरम्यान गेल्या वर्षभरात ७४१ प्रवाशांना आपलेे प्राण गमवावे लागले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनास देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील खाजगी अस्थापनांच्या कामाच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट (टास्क फोर्स) स्थापन करण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधान सभेत केली.

अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सरकारने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रोचे नेटवर्क वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सरकारने मेट्रो सोबतच जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना केल्या जात असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

रेल्वे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असली, तरी राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर आहे. मुंब्रा येथील रेल्वे अपघात ही अतिशय दुर्दैवी घटना होती. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू तर नऊ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपायोजना करणे संदर्भात रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्य सचिवांनी बैठक घेतली.

रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करणे, रेल्वे स्थानकामधील गर्दीचे व्यवस्थापन करणे, रेल्वे प्रवासादरम्यान होणारे प्रवाशांचे मृत्यू टाळणे व रेल्वे स्थानकांची सुरक्षा यासंदर्भात उपाय योजना करण्याचे आदेश रेल्वे विभागास देण्यात आले आहेत. तसेच सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या काळात उपनगरीय गाड्यांमध्ये गर्दीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा तसेच सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यासाठी एक तासाची लवचिकतेची सवलत दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाजगी आस्थापनांनीही त्यांच्या कार्यालयीने वेळेत बदल करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कृती गटाची नियुक्ती केली जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सध्याच्या दरातच वातानुकुलीत गाडीतून प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यासाठी तसेच सर्वच गाड्या वातानुकुलीत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करीत असून लवकरच याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.