मुंबई : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि त्यासह आलेल्या मुसळधार पावसाने मुंबई-ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी चांगलेच झोडपले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून धो धो पाऊस कोसळत असताना हवामान विभागाकडून मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला. हा इशारा सोमवारी सकाळी ११:३० पर्यंत देण्यात आला होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईमध्ये पुनरागमन केलेल्या पावसाने शहर आणि उपनगर, ठाणे परिसराला झोडपून काढले. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. पावसासह वाऱ्याचाही जोर होता. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. कर्मचारी वर्गाला कार्यालय गाठताना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, राजस्थानमधून मोसमी पावसाने माघार घेतली असल्याचे माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवला होता. एरवी अंदाज चुकवणाऱ्या पावसाने यावेळी हवामान विभागाला खोटे पाडले नाही. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाच्या हलक्या सरी मागील दोन दिवसांपासून शहरात कोसळत बरसत होत्या.

मुंबईत, विशेषतः उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्यातही पावसामुळे या भागातील अनेक रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते व महामार्गांवरील वाहतूक मंदावली होती. ठाण्यात हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर कुलाबा केंद्रात २४.७ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात २९.६ मिमी पावसाची नोंद झाली. ऐन गर्दीच्यावेळीच पावसाने दाणादाण उडवून दिल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, मुंबईसह, ठाणे पालघर जिल्ह्यात मंगळवारी देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विजांचा कडकडाट हे परतीच्या पावसाचे लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सध्या पडतोय तो परतीचा पाऊस नाही. विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

२४ तासांत १०० मिमी पाऊस

मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा रविवारी मध्यरात्रीपासून जोर वाढला. पावसाचा जोर सोमवारी पहाटेही कायम होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८:३० ते सोमवारी सकाळी ८:३० पर्यंत कुलाबा केंद्रात १३४.४ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ७३.२ मिमी पावसाची नोंद झाली.

इतर भागातील स्थिती

मुंबई बरोबरच राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर आहे. याआधी पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच शनिवारपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. या पावसामुळे पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता. अहिल्या नगर आणि नाशिक भागातही मुसळधार पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.

पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर , रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक , सोलापूर, सांगली , सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा.

अतिमुसळधार पाऊस

रायगड, पुणे.