मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भरणी केलेली लाल माती काढण्यास लवकरच सुरुवात होणार असून गुरुवार, ७ मार्च रोजी माती काढण्याच्या तंत्राची चाचणी करण्यात आली. मैदानात टाकलेली सुटी माती (लूज सॉईल) काढून टाकल्यानंतर उडणाऱ्या धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, मैदानातील माती न काढल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिल्यामुळे आता या कामाला वेग आला आहे.

दादर पश्चिमेला असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. या मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. तसेच विविध राजकीय आणि धार्मिक सभा आणि कार्यक्रमांनंतरही या मैदानाची दुर्दशा होत असते. त्यामुळे या धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या कित्येक वर्षांत या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे रहिवासी संघटनेने एप्रिल महिन्यात प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यानंतर रहिवासी संघटनेने मैदानात आंदोलनही केले होते. पालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची पेरणी केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले होते.

हेही वाचा – पुराव्यांअभावी छोटा राजनची आणखी एका खटल्यातून निर्दोष सुटका

हेही वाचा – आरेतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; तातडीने दुरुस्तीचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा दिवसांत काम सुरू

मैदानातील वरवरची माती काढण्यासाठी धूळ उपसा यंत्र वापरण्यात येणार आहे. त्याची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. लवकरच रितसर परवानगी घेऊन टप्प्याटप्प्याने मैदानातील माती काढण्याचे काम केले जाईल. घट्ट झालेली माती काढण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीने निर्णय घेतल्यानंतर ते काम हाती घेण्यात येईल. उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून वरवरची माती हटवण्याचे काम येत्या आठ- दहा दिवसांत सुरू करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी सांगितले. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी सांगितले की, मैदानातील धुळीच्या त्रासामुळे रहिवाशांना श्वासोच्छवासाचे व त्वचेचे आजार होत आहेत. त्यामुळे ही माती काढणे आवश्यक आहे.