मुंबई : महापालिका निवडणुकांत शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माणसेना युती होणार अशी चर्चा असली तरी .सर्व जागा लढण्याची तयारी करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. युतीचा निर्णय पक्ष ठरवेल, तुम्ही कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री निवासस्थानी पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर तयारी करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे मनसेसोबतच्या युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल व सर्वांना तो कळवलाही जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मुंबई महानगर परिसरातील ७ महापालिकांच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या महापालिकांतील पक्षीय बलाबलाची माहिती त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतली.
निवडणुकांची घोषणा लवकरच होईल. महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातचून संघटनात्मक बांधणी करा. न्यायालयाच्या निर्णयानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्याकडे लक्ष ठेवा. ज्या गोेष्टी घडत आहेत. त्याकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. मनसे सोबतच्या युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. त्याबद्दलची माहितीदेखील सर्वांना दिली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सत्ता नक्की – संजय राऊत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढले तर राज्यातील अनेक महापालिकांत आमची सवा नक्कीच येईल. आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे दोघे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिकमध्ये बहुमत प्राप्त करू, असे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील का, या प्रश्नावर मात्र त्यांनी काही बोलणे टाळणे. तो पुढचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.