विकास कामांचा आढावा, सततच्या बैठकी, समस्यांचे निराकरण थांबले

नागपूर : करोना काळात महापालिका कर्मचाऱ्यांची दिनचर्याच बदलून गेली आहे. विकास कामांचा आढावा, सततच्या बैठकी, समस्यांचे निराकरण ही आधीची प्रमुख कामे बाजूला सारून टाळेबंदीची अंमलबजावणी, विलगीकरण केंद्रातील काळजी असे नवीनच विषय त्यांच्या दिनचर्येचा भाग झाले आहेत.

शहरात मार्च महिन्यात पहिला करोनाग्रस्त  आढळून आला आणि त्यानंतर महापालिका प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धतच बदलून गेली. गेल्या अडीच महिन्यांपासून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी करोनाशी संबंधित विलगीकरण केंद्र, लोकांना घरून विलगीकरणात नेणे, तपासणी, रुग्ण शोधणे, वस्त्या प्रतिबंधित करणे, विलगीकरणातील व बेघर असलेल्या लोकांची भोजनाची व्यवस्था करणे आदी कामात व्यस्त  आहे. शहरातील दहा झोन असून त्या त्या झोनमधील विलगीकरण केंद्राची व परिसरातील रुग्णांचा शोध घेऊन त्या भागात सर्वेक्षण केले जात आहे. करोनाचा संसर्ग होईल, या भीतीने  लोक घराबाहेर पडत नसताना महापालिकेचे कर्मचारी मात्र करोना  रुग्ण असलेल्या भागात काम करत आहेत. करोनाशी लढताना आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यावर त्यांचाही अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले तर काही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना  विलगीकरणात जावे लागले. एकाचे ह्दयविकारामुळे निधन झाले. मात्र त्यानंतरही आरोग्य विभागातील कर्मचारी थांबले नाहीत. करोना सोबत जगत काम करत आहेत. कर विभागाकडे निवारा केंद्र व भोजनाची व्यवस्था तर शिक्षण विभागाकडे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. समाज कल्याण, आस्थापना, नगरविकास विभागाचे कर्मचारी विलगीकरण केंद्र तर आरोग्य विभागाकडे तपासणीसह स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे कामे देण्यात आली होती. पुढच्या काळातही या कर्मचाऱ्यांना असेच करोनासह जगावे लागणार आहे.

सहकाऱ्यांशी संवाद थांबला

करोनामुळे अन्य शासकीय व किंवा खासगी कार्यालयात ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याची सक्ती असली तरी महापालिकेत मात्र तसे काहीच नव्हते. महापालिकेत विविध विभागांच्या कार्यशैलीनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामे होत असताना मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून मात्र केवळ करोना हेच लक्ष्य  समोर ठेवत अधिकारी व कर्मचारी त्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. कामे आटोपून कार्यालयात आले तरी विभागात जवळजवळ बसणारे कर्मचारी आता सामाजिक अंतर ठेवून बसतात. दुपारच्यावेळी एकत्र येऊन डबा खाणे किंवा बाहेर जाऊन चहाचा आस्वाद घेणे बंद झाले आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे होऊ लागलेल्या आहे त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यासोबतचा संवाद गेल्या काही दिवसांपासून थांबला आहे.