तिसऱ्या आशियाई देशांच्या व्याघ्र संवर्धन परिषदेत कठोर वास्तव उघड

केवळ देशातच नाही, तर जगभरात वाघांची संख्या वाढत असताना भारतात वाघांच्या अधिवास क्षेत्रात तब्बल २० हजार चौरस किलोमीटरने घट झाली आहे. ते वाढवण्यासाठी आता केंद्र व राज्यांनी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा विचार मंगळवारी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या आशियाई वाघ्य्र संवर्धन परिषदेत व्यक्त झाला. देशात दरवर्षी जागतिक व्याघ्र दिवस साजरा करण्यासोबतच वाघांचा अभ्यास करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात संशोधन केंद्र उभारण्याची मागणी या परिषदेत महाराष्ट्राच्यावतीने करण्यात आली.

तिसऱ्या आशियाई देशांच्या व्याघ्र संवर्धन परिषदेत आशिया खंडातील १३ देशांचे, तसेच देशातील सर्व राज्यांचे वनमंत्री सहभागी झाले होते.  या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत महाराष्ट्राच्या वतीने मुनगंटीवार यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, वाघ ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याच्या संवर्धनाचा सर्वाधिक भार उचलण्याची जबाबदारीही केंद्राची आहे. नक्षलग्रस्त परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाकरिता १०० टक्के पैसा केंद्राकडून दिला जातो. व्याघ्र संरक्षणासाठी असणाऱ्या विशेष व्याघ्र संरक्षण दलासाठीही केंद्राकडून पैसा दिला जावा.  सध्या ६० टक्के केंद्राकडून, तर ४० टक्के निधी राज्याकडून दिला जातो. व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडून १० लाख रुपये दिले जातात. त्यात शेतीचा मोबदला नसतो. परिणामी, अनेक व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन रखडले आहे. रेडीरेकनरच्या चारपट भाव शेतीला मिळावा आणि तो पैसा केंद्राने द्यावा, अशी भूमिका यावेळी मुनगंटीवार यांनी घेतली.

विदर्भात व्याघ्य्र संशोधन केंद्र?

  • भारतात वैयक्तिक पातळीवर किंवा संस्थात्मक पातळीवर वाघांवर संशोधन होते. केंद्रीय पातळीवर असे संशोधन करण्यासाठीचे केंद्र सर्वाधिक वाघ असणाऱ्या विदर्भातील नागपूर किंवा चंद्रपूर जिल्ह्यत व्हावे.
  • नागपूरच्या ३०० किलोमीटरच्या परिसरात १३ व्याघ्र प्रकल्प आहेत. आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, अशी चार राज्ये मिळून ३२५ वाघ आहेत.
  • वाघांवरील संशोधन केंद्रसुद्धा येथे व्हावे, अशी भूमिका महाराष्ट्राने मांडली. त्यावर केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक मत दिले.

वाघांच्या अवयवांचा व्यापार तेजीत असतानाच वाघांच्या शिकारीचा सामना भारताला करावा लागत आहे. मात्र, त्याचवेळी वृक्ष, प्राणी, जंगल, नदी याचा आदर करणारी भारतीय जनता आहे आणि भारतासाठी ही सकारात्मक बाजू आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान