विषय समिती सदस्य निवडीवरून धुसफूस; सलील देशमुखांसह सहा सदस्यांची माघार

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. विषय समितीच्या सदस्यांची निवड करतानाही हेच धोरण कायम ठेवल्याने राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्र्यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी उघडपणे काँग्रेसवर टीका करीत वेळ पडल्यास विरोध केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, सोमवारी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. सलील देशमुख यांनीही अर्ज भरला होता. पण त्यांच्यासह सहा सदस्यांनी नंतर माघार घेतल्यावर दहा विषय समित्यांवर सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. महत्त्वाच्या स्थायी समितीवर ज्येष्ठ आणि तज्ज्ञ सदस्यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत विशेष समितीची सभा पार पडली. स्थायी समितीबरोबरच कृषी, समाजकल्याण, शिक्षण समितीसाठी प्रत्येकी एक तर महिला व बाल कल्याण समितीसाठी दोन अर्ज अतिरिक्त आले होते. अर्ज मागे घेण्यासाठी सभागृहाने अर्धा तास दिला. या काळात सलील देशमुख, मनीषा फेंडर, दीक्षा मुलताईकर, पिंकी कौरती, वंदना बालपांडे, ज्योती शिरस्कर यांनी माघार घेतली. जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढवली. काँग्रेसला निवडणुकीत संपूर्ण बहुमत प्राप्त झाले. त्यामुळे त्यांनी एक विषय समितीचे सभापतीपद वगळता सर्व अध्यक्षांसह सर्व महत्त्वाची पदे स्वत:कडे ठेवली. विषय समिती सदस्यांची निवड करतानाही हेच धोरण ठेवल्याने सलील देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली. वेळ पडल्यास राष्ट्रवादीच्या सभापतींसह सत्ताधाऱ्यांचा विरोध करू असे त्यांनी बजावले.

समितीनिहाय सदस्य

स्थायी समिती- ज्योती राऊत, वंदना बालपांडे, ज्ञानेश्वर कंभाले, अवंतिका लेकुरवाळे, संजय झाडे, अनिल निधान, आतिष उमरे, दिनेश बंग.

बांधकाम समिती- कैलास बरबटे, व्यंकट कारेमोरे, चंद्रशेखर कोल्हे, दुधाराम सव्वालाखे, अर्चना भोयर, माधुरी गेडाम, शालिनी देशमुख, छाया बनसिंगे.

आरोग्य समिती- पुष्पा चाफले, कविता साखरवाडे, मनीषा फेंडर, सलील देशमुख, देवका बोडखे, नीलिमा उईके, अर्चना भोयर, शालिनी देशमुख.

अर्थ समिती- प्रमिला दंडारे, राधा अग्रवाल, सुचिता ठाकरे, राजकुमार कुसुंबे, ज्ञानेश्वर कंभाले, मुक्ता कोकर्डे, योगेश देशमुख, देवानंद कोहळे.

जलव्यवस्थापन- ज्योती शिरस्कर, ममता धोपटे, प्रकाश खापरे, छाया बनसिंगे, अनिल निधान, सलील देशमुख

समाजकल्याण- सुभाष गुजरकर, समीर उमप, मुक्ता कोकर्डे, राजकुमार कुसुंबे, कैलास राऊत, शंकर डडमल, मेघा मानकर, ममता धोपटे, महेंद्र डोंगरे, शांता कुमरे.

कृषी समिती- सतीश डोंगरे, भोजराज ठवकर, वृंदा नागपुरे, समीर उमप, पिंकी कौरती, मिलिंद सुटे, योगेश देशमुख, सुनीता ठाकरे, कैलास राऊत, प्रीतम कवरे.

शिक्षण व क्रीडा- राजेंद्र हरडे, मोहन माकडे, देवका बोडखे, दुधाराम सव्वालाखे, मिलिंद सुटे, सुनीता ठाकरे, प्रकाश खापरे, शांता कुमरे.

पशुसंवर्धन- पुष्पा चाफले, राजेंद्र हरडे, दीक्षा मुलताईकर, पूनम जोध, प्रीतम कवरे, मेघा मानकर, महेंद्र डोंगरे, देवानंद कोहळे.

महिला व बाल कल्याण- अनिता वलके, अर्चना गिरी, राधा अग्रवाल, पूनम जोध, सुचिता ठाकरे, नीलिमा उईके, पिंकी कौरती, ज्योती राऊत, माधुरी गेडाम, वंदना बालपांडे.