अमरावती : येत्या ६ जुलैला आषाढी एकादशी आहे. सर्व भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दिवशी काही तरी बोलले पाहिजेत, याची प्रतीक्षा करीत आहोत. किमान त्यांनी पांडुरंगाला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य तारीख सांगितली पाहिजे, असा टोला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लगावला आहे.
बच्चू कडू म्हणाले, योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. आता योग्य तारीख कोणती हे त्यांनी पांडुरंगाला तरी सांगावी, असे आमचे म्हणणे आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. ६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी ती योग्य तारीख जाहीर करावी, अशी आमची विनंती आहे.
शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्याय हक्कांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलै पासून सुरू होणार होती. पण, ६ जुलैच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा आता ७ जुलैपासून सुरू होणार आहे.
त्याविषयी बच्चू कडू म्हणाले, आम्ही ७ तारखेपासून ते १४ तारखेपर्यंत आमची पदयात्रा चालणार आहे. येत्या २ ऑक्टोबरच्या लढ्यासाठी ही तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल, असे काही लोकांचे म्हणणे होते, पण सरकारला फेब्रुवारी महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत, असे वाटते. कारण अजूनही महापालिकांमध्ये प्रभागाच्या रचना झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदांच्या सर्कलच्या रचना झालेल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहितेत आमचे आंदोलन अडकून पडेल, असे होणार नाही.
आम्ही सरकारकडे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर मागण्या केल्या आहेत. त्या एकट्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या नाहीत. त्या सर्वसामान्यांच्या आहेत. सरकारने त्या पूर्ण केल्या पाहिजेत, असे बच्चू कडू म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही येत्या ५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याविषयी विचारले असता, बच्चू कडू म्हणाले, एक मराठी भाषिक म्हणून मला देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता. या मोर्चात सहभागी होण्याची विनंती त्यांनी आपल्याला केली. ५ जुलैला आम्ही या मोर्चात जाण्याचा प्रयत्न करू. आमचा मोर्चाला पाठिंबा आहे.