बुलढाणा : जिल्हा आणि प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात शासकीय नोकरीचा महाघोटाळा उघडकीस आलाय! भपकेबाज वागणूक, बोलणे, मंत्रालयाचे बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे याचा वापर करीत चौघा ठगसेनांनी तब्बल ६२ जणांना शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली जवळपास दोन कोटी रुपयांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गवळी कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादींच्या आधारे १ कोटी ९६ लाख ६७ हजार रुपयांनी फसवणूक केली. मुख्य आरोपी निलेश गवळी (३१) याने पत्नी कोमल, वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश यांच्यासह हा नोकरीचा महाघोटाळा केला. यामुळे सर्वसामान्य बुलढाणावासी, प्रशासकीय आणि पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

हेही वाचा : पाण्यामुळे नव्हे, ‘फंगस’मुळे केस गळती… आता खुद्द मंत्रीच म्हणाले, बिनधास्त आंघोळ…

सदर फसवणूक २०१९ ते २०२४ या कालावधीत अत्यंत चातुर्याने करण्यात आली. नोकरीचे आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी रोख, चेक व ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे उकळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, आरोग्यसेवक तसेच इतर सरकारी पदांसाठीच्या खोट्या जाहिरातींद्वारे आरोपींनी लोकांना भूलथापा दिल्या. बनावट नियुक्तीपत्रे, मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तावेज तयार करून फसवणूक केली.

बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी निलेश गवळीसह चार जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर पीडितांच्या म्हणण्यानुसार, आरोपी निलेश गवळी याने मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्केही तयार केले होते.

हेही वाचा : ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य

पैसे भरल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने अनेक पीडितांना मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विश्वनाथ गव्हाणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फसवणूक झालेल्या इतर बेरोजगार युवक, युवती आणि त्यांचे कुटुंबीय यांची नावे अद्याप उघड झाली नाही. त्यांची एकूण फसवणूक जवळपास दोन कोटींच्या घरात आहे. गवळी कुटुंबीयांची फसवणूक उघड झाल्याने फसवणूकग्रस्त परिवारासाह संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.