एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपण्याचे नाव घेत नसून प्रवाशांचे हाल कायम आहे. त्यातच गुरुवारीही नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने १० आंदोलकांचे निलंबन केले. पण एसटीची वाहतूक ठप्प असल्याने मेडिकल रुग्णालयात उपचाराला येणाऱ्या कर्करुग्णांची संख्याही निम्म्याने कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे कर्करुग्णांच्या वेदना वाढल्याचे चित्र आहे.

 नवीन निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये इमामवाडा आगारातील १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील आजपर्यंतच्या निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४३० वर पोहचली आहे. दरम्यान एसटीची वाहतूक ठप्प असल्याने विविध जिल्ह्यांसह गावातून नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचासाठी येणाऱ्या कर्करुग्णांची संख्याही खूप खाली आली आहे. कारण मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या कर्करुग्णांना एसटीची सवलत दिली जाते. त्यानुसार रुग्णांना केवळ २५ टक्के तिकीट शुल्क तर सोबत येणाऱ्या नातेवाईकाला मात्र पूर्ण तिकीट लागते. परंतु एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनाही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना अवास्तव शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय या रुग्णांना घरी वेदना सहन कराव्या लागत असल्याची माहिती खुद्द नातेवाईकांकडून दिली जात आहे. तर मेडिकलच्या कर्करोग विभागात रुग्णसंख्या पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे जाणवत असल्याचेही येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक दिवान यांनी दिली. मेडिकलच्या कर्करोग विभागात पूर्वी रोज दीडशेहून अधिक रुग्ण उपचाराला येत होते. परंतु आता ही संख्या ६० ते ७० दरम्यान आली आहे. त्याला एसटी बसेस बंद असण्यासह करोनाच्या काही प्रमाणातील भीतीसह इतरही कारण जबाबदार राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

विदर्भात ८ बसेस धावल्या

 राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत विदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचा संप जास्तच प्रभावी दिसत आहे. त्यानंतरही गुरुवारी संध्याकाळी ६ वाजतापर्यंत विदर्भातील वर्धा विभागातून ७ आणि भंडारा विभागातून १ अशा एकूण ८ बसेस धावल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने शहरात शिक्षणासाठी येत असतात. एसटी हे एकमेव त्यांच्या प्रवासाचे साधन आहे. संपामुळे बस बंद असल्याने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने गैरहजर राहत आहेत.

– दिलीप तडस, उपमुख्याध्यापक, विदर्भ बुनियादी शाळा.

१८ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने पहिल्या टप्प्यात संपासाठी पुढाकार घेणाऱ्या १८ आंदोलक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. या पहिल्या टप्प्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आता बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार प्रथम सगळय़ा कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार संबंधितावर पुढील कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.