कागदोपत्री चौदा साखर कारखान्यांचे अस्तित्व

अमरावती : राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा विक्र मी साखर उत्पादन होण्याची चिन्हे असताना विदर्भात मात्र या हंगामात पोषक स्थिती नाही. कागदोपत्री चौदा साखर कारखान्यांचे अस्तित्व असलेल्या विदर्भात आतापर्यंत केवळ एका कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला असून हा कारखाना खासगी आहे.

राज्यात एकू ण ३५ सहकारी आणि ४० खासगी साखर कारखान्यांसह ७५ कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत ३१ लाख ७३ हजार मे. टन उसाचे गाळप झाले असून २४.६९ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. विदर्भात गेल्या २६ ऑक्टोबरपासून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुंज-सावनाच्या नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड या कारखान्यात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. उर्वरित साखर कारखाने गाळपाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्यावर्षी विदर्भात पाच साखर कारखान्यांनी गाळप केले. हे सर्व कारखाने हे खासगी होते. यंदा, मात्र हंगाम सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी एकाच कारखान्याचे धुरांडे पेटले आहे. विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८.५० ते ९ लाख मे.टन उसाचे गाळप होते. उसाची उपलब्धतता मात्र ७ ते ७.५० लाख टनापर्यंतच आहे. केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रातच उसाची लागवड आहे. विदर्भात वीस कारखान्यांची उभारणी दशकभरापूर्वी करण्यात आली होती. पण कालौघात कारखाने आजारी आणि बंद पडले. काही कारखान्यांना तर एकाच गाळप हंगामानंतर टाळे लागले. १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने खासगी उद्योजकांना विकण्यात आले. बंद कारखान्यांचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता कमी  आहे.

अमरावती विभागातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ही केवळ ५ हजार मे. टन तर नागपूर विभागातील क्षमता ही ५ हजार ६०० मे.टन इतकीच आहे. राज्यातील इतर भागात होणाऱ्या उसाच्या गाळपाच्या तुलनेत विदर्भातील कारखान्यांची क्षमता नगण्य बनली आहे. वीस कारखान्यांची उभारणी करणाऱ्या विदर्भात सहकारी साखर कारखान्यांना दशकभरात घरघर लागली आणि या कारखान्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले. पण, या कारखान्यांपैकी काही कारखाने खासगी उद्योजकांनी आपल्या ताब्यात घेतले, तेव्हा अचानक या कारखान्यांमध्ये लाभाचे दर्शन घडू लागले.

गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ ऊस गाळपाच्या बाबतीत पिछाडीवर गेला आहे. साधारणपणे दरवर्षी पाच ते सहाच कारखाने प्रत्यक्ष गाळप सुरू करू शकतात. गेल्यावर्षीच्या हंगामात अमरावती विभागातील दोन आणि नागपूर विभागातील तीन असे पाच कारखाने गाळप घेऊ शकले. या कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता केवळ ११ हजार २५० मे.टन इतकी होती. या कारखान्यांमधून ९.६४ लाख मे. टन उसाचे गाळप, ९.५७ लाख क्विंटल साखर तयार झाली. यंदा देखील पाचहून अधिक कारखाने गाळप सुरू करू शकणार नाहीत, असा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत विदर्भातील ऊस लागवडीच्या क्षेत्रात १२ हजार हेक्टरहून २० हजार हेक्टपर्यंत वाढ झाली आहे. हे चांगले संकेत मानले जात असले, तरी विदर्भातील इतर कारखाने सुरू करण्यासाठी अधिक उसासोबत राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची मानली जात आहे.