वर्धा: भाजपसाठी आर्वी मतदारसंघ अवघड जागेचे दुखणे ठरत असल्याच्या घडामोडी आहेत. या ठिकाणी भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहिर केलेला नाही. सर्वच प्रतीक्षेत आहेत. विद्यमान आमदार दादाराव केचे शद्दू ठोकून बसले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलावून चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णयात्मक मेळावा रद्द केला होता. पण आता पक्षने तिकीट दिली नसूनही त्यांनी अर्ज भरण्याची तारीख जाहिर करून टाकली. एका खुल्या निमंत्रणातून त्यांनी २८ ऑक्टोबर सोमवारला सकाळी दहा वाजता सहकार मंगल कार्यालयात समर्थक मंडळीस बोलावले आहे. क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील मायबाप मतदारांनो अशी साद त्यांनी घातली आहे. या दिवशी अर्ज सादर करणार असून आशीर्वाद देण्यासाठी या, अशी विनंती केली आहे.

अधिकृत तिकीट नसल्याने त्यांनी पक्षाचे चिन्ह किंवा मोठ्या नेत्यांचे फोटो टाकले नाही. त्यामुळे तिकीट मिळो अथवा न मिळो, निवडणुकीस उभे राहणारच, असा केचे यांचा निर्धार दिसून येत आहे. त्यांची पक्षात फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्याशी स्पर्धा आहे. गत विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचे विश्वासू सुधीर दिवे यांच्याशी स्पर्धा होती. त्यावेळी ही अंतिम निवडणूक असल्याने संधी द्यावी असा त्यांचा आग्रह मान्य झाला. मात्र असे काही म्हटलेच नव्हते, असे केचे स्पष्ट करतात. त्यामुळे कोण खरं व कोण खोटं हे गुपितच आहे. पण आता अंतिम क्षणापर्यंत तिकीट जाहिर न झाल्याने सुमित वानखेडे यांचीच उमेदवारी येणार, अशी भाजप वर्तुळत चर्चा आहे. मात्र भाजपच्या या गोंधळाने तिकीट जाहिर झालेल्या काँग्रेस वर्तुळस आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे दिसून येत आहे. आपलाच विजय पक्का, असे काँग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहे.

हेही वाचा >>>मेळघाटात दशकभरानंतर काँग्रेसचा पंजा मैदानात; विरोधकांचे पक्ष बदलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र काही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले की बंडखोरी होणार नाही. काँग्रेसने स्वप्ने रंगवू  नये. पक्षनेते यातून मार्ग काढणार. उलट खासदारावर  पसरत चाललेल्या नाराजीचा फायदा आम्हालाच मिळणार. उदया सोमवारी केचे अर्ज भरणार की तलवार म्यान करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हिंगणघाट, वर्धा व देवळी येथील भाजप उमेदवार जाहिर झाले आहेत. चारही जागा भाजपच लढविणार असा पक्षाचा निर्धार पूर्ण झाला. पण आता या निर्धारावर  आर्वीचे मळभ  दाटून आले आहे.