लोकसत्ता टीम

वर्धा : आधी लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत राजकीय सजग झालेल्या तेली समाज संघटनेने तिकीट वाटपात प्रत्येक पक्षाने समाधानकारक उमेदवारी द्यावी म्हणून अधिकृत भूमिका मांडली होती.

तिकीटवाटप झाल्यावर समाजास विविध पक्षाने दिलेले प्रतिनिधीत्व याबद्दल समाधान पण व्यक्त केले होते. मात्र एका जागेबाबत समाजाच्या माहिती पत्रात शंका व्यक्त झाली. तुमसर येथे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने युतीतर्फे तर विरोधात चरण वाघमारे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने आघाडीतर्फे तिकीट दिले आहे. त्यामुळे तेली विरुद्ध तेली असा सामना होऊन भलताच निकाल लागतो की काय अशी शंका येण्यास वाव असल्याचे पत्रकात म्हटल्या गेले.

आणखी वाचा-माजी मंत्री अशोक शिंदे स्वगृही, पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण

दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगणघाट होय. या ठिकाणी शरद पवार गटाने अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज माजी आमदार राजू तिमांडे यांनी बंडखोरी केली आहे. तेली विरुद्ध तेलीच असा तिढा झाला आहे. त्यामुळे तुमसर व हिंगणघाट येथे तेली समाजाच्या मतात फूट पडून नुकसान तर होणार नाही, अशी भीती पुढे येत आहे. तिमांडे हे गत निवडणुकीत ५३ हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहले होते. पण पक्षाने त्यांना तिकीट नाकारून पक्षात नवखे अतुल वांदिले यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत तिमांडे व सुधीर कोठारी हे पक्षाबाहेर पडले.

आणखी वाचा-मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच शरद पवार यांचा दौरा झाला असतांना त्यांनी सुधीर कोठारी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच तो ( तिमांडे ) ऐकणारा नाही, अशी टिपणी केल्याचे समजले. मात्र आज पक्ष स्थापनेपासून सोबत असणाऱ्या तिमांडे यांना बाजूला केल्याने कोठारी व अन्य पक्ष समर्थक तिमांडे यांच्यासोबत उभे असल्याचे पाहायला मिळते. पण मुद्दा तिमांडे व वांदिले यांच्यातील समाजाच्या मतांच्या विभागणीचा उपस्थित होत आहे. समाजाचे नेते यावर अधिकृत भाष्य करीत नाही. पण समाज संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले की पक्षाचा अधिकृत उमेदवार हा निकष नसतो. जो समाजाच्या कार्यात सहभागी झाला, कामे केली, उपलब्ध असतो, त्यास प्रथम पसंती असते. त्यामुळे स्थानिक मतदार समाजाचा योग्य उमेदवार कोण, याचा निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले. समाजाच्या मतांचे विभाजन झाल्यास अन्य उमेदवारास त्याचा फायदा होवू शकतो, ही भीती व्यक्त होतेच.