नागपूर : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर – मिरज विशेष गाडी ४ आणि ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज स्थानकावर पोहोचेल.

मिरज – नागपूर विशेष गाडी ६ आणि ७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.२५ वाजता मिरज स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी १२.५५ वाजता नागपूर स्थानकावर येईल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा,मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला,म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगर, अरग येथे थांबे देण्यात आले आहते. या गाडीला एकूण १८ डबे राहतील. यामध्ये १० शयनयान डबे, ४ सर्वसामान्य श्रेणी डबे, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे व दोन गार्ड-कम-लगेज डबे राहतील.

एकाच दिवशी फुकट्या प्रवाशांकडून ८.३५ लाख वसूल

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि एकाच दिवसात विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांकडून ८.३५ लाख वसूल केले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ९ जून २०२५ रोजी त्यांच्या अखत्यारीतील २० गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवली. तिकीटरहित आणि अनियमित प्रवासाला आळा घालणे, महसूल वाढवणे आणि प्रवाशांमध्ये शिस्त वाढवणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मोहीमेत ८० तिकीट तपासणी कर्मचारी, १० रेल्वे संरक्षण दल कर्मचारी आणि २ व्यावसायिक निरीक्षक यांचा समावेश असलेल्या एका समर्पित पथकाने तपासणी केली. विभागातील व्यावसायिक अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे सक्रियपणे निरीक्षण केले. त्यामुळे पद्धतशीर अंमलबजावणी आणि पारदर्शकता सुनिश्चित झाली. या एकाच दिवसाच्या प्रयत्नात पथकाला अनियमित किंवा तिकीटरहित प्रवासाची १,३५५ प्रकरणे आढळून आली. या उपक्रमामुळे एकूण ८,३५,७६० ची कमाई झाली.