लोकसत्ता टीम
वर्धा : मंत्री असो की अन्य शासकीय वरिष्ठ. त्यांचा नियोजित दौरा आगाऊ सूचित केल्या जातो. ते आल्यास शासकीय यंत्रणा दक्ष राहली पाहिजे, ही अपेक्षा असते. तो प्रोटोकाल म्हणजे राजशिष्टाचाराच भाग असतो. पण पालकमंत्री येतात आणि ठरल्यानुसार विश्राम गृहावार पोहचतात तेव्हा पाहतो तो काय, सर्वत्र शुकशुकाट.
आज सायंकाळी तसेच घडले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर हे नियोजित कार्यक्रमानुसार विश्राम भवनात पोहचले. पण त्यावेळी सामसूम दिसून आले. अपेक्षित अधिकारी नव्हतेच. ते नव्हते म्हणून खानसामा व अन्य कर्मचारी नव्हते. वीज पुरवठा पण ठप्प पडला होता. मिटिंग घ्यायची तर कशी, असा प्रश्न डॉ. भोयर व अन्य ज्येष्ठ नेत्यांना पडला.
मात्र, पालकमंत्री नियोजित वेळेत आले आहे हे कळताच अपेक्षित प्रथम जबाबदारी असणारे बांधकाम कार्यकारी अभियंता अंभोरे हे मग हजर झाले. त्यांना पाहता क्षणीच पालकमंत्री भडकले. मला काय घरचाच समजले काय, काही प्रोटोकाल असतो की नाही, तुम्हास ××××काढले पाहिजे. हद्द झाली तुमच्या बिनधास्तपणाची असा संताप व त्रागा पालकमंत्री डॉ. भोयर यांनी व्यक्त करून टाकला.
कधीच न रागावणारे व संताप व्यक्त न करणारे म्हणून पालकमंत्री यांची ओळख आहे. हा निगर्वीपणा तर गृहीत धरल्या जात नाहीना, अशी चर्चा जोमात सूरू झाली. यावेळी उपस्थित माजी खासदार रामदास तडस हे म्हणाले की नेत्यांनी सभ्य वागणूक द्यावी ही अपेक्षा सर्वच ठेवतात. आमच्या वर्धा जिल्ह्यातील सुसंकृत नेता म्हणून डॉ. भोयर यांची ओळख मुंबई ते दिल्लीपर्यंत आहे. पण सहज वागले की प्रशासन पण गृहीत धरून वागणार असेल तर ते आम्हीच काय कोणताही पक्ष खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करीत तडस म्हणाले की यापुढे पालकमंत्री यांचा सन्मान राखण्याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, ही अपेक्षा.
मात्र, या एका घटनेने काही नागरिक पण संतप्त झाल्याचे दिसून आले. कारण या ठिकाणी आदिवासी बांधव पण आले होते. त्यांना उपयुक्त ठरणारे आदिवासी प्रकल्प कार्यालय बांधून तयार झाले. त्याची पाहणी पण झाली. म्हणून आदिवासी समाज संघटना पुढारी इथेच विश्राम गृहावर आले होते. आनंद व्यक्त करायचा म्हणून ते केक सोबत घेऊन आले. पण त्यांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. ते तिष्ठत बसले. त्याचा सर्वाधिक संताप पालकमंत्री भोयर यांना आल्याचे सांगितल्या जात आहे.