नागपूर : मान्सूनच्या परतीची वेळ जसजशी जवळ आली आहे, तसतसे मान्सूनचा जोर आणखीच वाढताना दिसून येत आहे. गणरायाच्या आगमनाचा पावसाने हजेरी लावली असतानाच आता गौराईच्या स्वागताला देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून उपराजधानीत पावसाला सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सव, गौराईचे आगमन पावसात
सप्टेंबर महिन्याची सुरुवातच पावसाने केली आणि या पावसाने सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यात ठाण मांडले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा परतला असून आता विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या २४ तासात प्रामुख्याने विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पावसात न्हाऊन निघणार असे म्हणायला हरकत नाही. तर संपूर्ण राज्यातच गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी असंणार यात शंका नाही.
हे ही वाचा…बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक
पावसाचे अलर्ट कोणत्या भागात?
विदर्भाची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा… नागपूरच्या नंदनवनात देहव्यवसाय फोफावला!; अल्पवयीन मुलींकडून…
नागरिकांना कोणता इशारा ?
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील पावसालाही वादळी वाऱ्यांची साथ असल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा…गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
विदर्भात कालपासूनच पावसाचा जोर
विदर्भात काळापासूनच पावसाने जोर आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. संपूर्ण जिल्ह्यात पुरसदृश्य स्थिती होती. तर नागपुरात देखील काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातच एका घरावर वीज पडली.