नागपूर : नायलॉन मांजावर अंकुश लावण्यात प्रशासनाला आलेले अपयश माणसांचाच नाही तर पक्ष्यांचा देखील बळी घेत आहे. मकरसंक्रांतीच्या सुरुवातीलाच उपराजधानीत माणसे जखमी झाली आणि तीच पुनरावृत्ती पक्ष्यांबाबतही झाली असून मकरसंक्रांतीच्या पहिल्याच दिवशी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात विविध जखमी पक्ष्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चित्र बलाक (पेंटेड स्टोर्क) या पक्ष्याला मांजामुळे झालेली जखम एवढी गंभीर होती की त्याचा बळी गेला.

मकरसंक्रांत म्हणजे नात्यातील गोडवा वाढवण्याचा सण. रंगीत पतंगांनी आकाशात गेलेली गर्दी न्याहाळण्याचा क्षण, पण गेल्या काही वर्षात नायलॉन मांजामुळे या सणाला आणि पतंगांच्या आनंदाला गालबोट लागले आहे. मांजामुळे अनेकांचा बळी जात असून त्याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांनाही बसत आहे. शहरात दरवर्षी शेकडो पक्षी या मांजामुळे जखमी होत आहेत. दरवर्षी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात त्यांच्यावर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान काही पक्ष्यांचा मृत्यूदेखील होत आहे.

हेही वाचा : गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…

दरम्यान, विद्यार्थ्यांमार्फत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान देखील राबवण्यात आले आहे. विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात बोलावून नायलॉन मांजामुळे पक्ष्यांची होणारी अवस्था त्यांना प्रत्यक्षात दाखवून नायलॉन मांजा न वापरण्याचे धडे दिले जात आहेत. मुलांच्या माध्यमातून समाजात जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना पक्ष्यांबद्दल व त्यांच्यावरील उपचारावर ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात किती मेहनत घेतली जात आहे, याची माहिती कुंदन हाते, डॉ. सुदर्शन काकडे, पंकज थोरात व संपूर्ण ‘ट्रान्झिट’ची चमू देत आहे.

हेही वाचा : बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळ पासून नायलॉन मांजाचे पाच पक्षी या केंद्रात उपचारासाठी आलेत. गेल्या काही दिवसांपासून ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राने आवाहन केले आणि त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळपासून नायलॉन मांजाने जखमी झाले दोन घुबड, एक बगल, दोन कबुतर, दोन वटवाघूळ आणि एक चित्र बलाक पक्षी उपचारासाठी आणले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेला चित्र बलाक पक्षी मृत पावला.